मंगेश काळोखे यांची सुपारी देऊन हत्या; दोनजण अटकेत

खोपोली येथील हत्येचा उलगडा , पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची माहिती

By Raigad Times    04-Jan-2026
Total Views |
alibag
 
अलिबाग | खोपोली येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची सुपारी देऊन हत्या करण्यात आल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन मारेकर्‍यांना अटक केली असून, आणखी एकजण फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिली आहे.
 
शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबर रोजी राजकीय वादातून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. काळोखे यांच्या पत्नीने रविंद्र देवकर याच्या पत्नीचा पराभव केला. या रागातून देवकर याने काळोखे यांच्या हत्येची सुपारी दिली.
 
alibag
 
याप्रकरणी एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये रविंद्र देवकर, दर्शन रविंद्र देवकर, धनेश रविंद्र देवकर, उर्मिला रविंद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी धायतडक, सागर राजू मोरे, सचिन दयानंद खराडे आणि दिलीप हरीभाई पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, सुधाकर घारे, प्रवक्त्यांसह भरत भगत यांचा समावेश होता. या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात असून, काळोखे यांच्या हत्येसाठी तीन कॉन्ट्रॅक्ट किलरना सुपारी देण्यात आल्याचे समोर आले आहे.
 
याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. एकाचा शोध सुरु असून त्यालादेखील लवकरच अटक होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल असलेल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही पदाधिकार्‍यांना सध्या तरी अटकेची गरज नाही. मात्र शेवटचा आरोपी ताब्यात आल्यानंतर या खुनाची पूर्ण उकल होईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.