पनवेल | पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने राजकीयदृष्ट्या अप्रत्यक्ष निर्णायक ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत महाविकास आघाडीला जोरदार हादरा दिला आहे.
प्रभाग क्रमांक १८, १९ आणि २० मधील मविआच्या उमेदवारांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे या तिन्ही प्रभागांमध्ये भाजप व संबंधित उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास प्रचंड वाढला असून विरोधकांची रणनीती पूर्णतः कोलमडल्याचे चित्र आहे.
प्रभाग क्रमांक १८ मध्ये भाजपचे नितीन जयराम पाटील यांच्याविरोधात शेतकरी कामगार पक्षाचे रोहन गावंड यांचा उमेदवारी अर्ज जात प्रमाणपत्र व पडताळणी पावती नसल्याने बाद झाला. गावंड हे पूर्वी प्रितम म्हात्रे यांचे स्वीय सहाय्यक होते. शेकापने कोणतीही प्राथमिक छाननी न करता उमेदवारी दिल्याचा फटका पक्षाला बसला आणि नितीन पाटील बिनविरोध निवडून आले.
ममता म्हात्रेंचा निर्विवाद विजय!
प्रभाग क्रमांक १८ अ मधून माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या पत्नी ममता म्हात्रे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या विरोधामध्ये सेजल श्याम खडकबाग यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. शुक्रवारी (२ जानेवारी) मशालीच्या या उमेदवाराने आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले. त्यामुळे प्रितम म्हात्रे निवडणूक लढवत नसले तरी त्यांच्या पत्नीचा निर्विवाद विजय झाला.
अपक्ष स्नेहल ढमाले बिनविरोध!
प्रभाग १८ मध्ये सर्वसाधारण महिला जागेसाठी भाजपकडून सुवर्णा सुनील तोंडूरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र आमदार विक्रांत पाटील यांच्या भगिनी स्नेहल स्वप्निल ढमाले यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. मात्र भाजपसह इतर सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे स्नेहल ढमाले बिनविरोध निवडून आल्या. परिणामी विक्रांत पाटील यांनी आपल्या ‘होम ग्राऊंड’वर गुलाल उधळत शक्तिप्रदर्शन केले.
कुलकर्णींची माघार, भाजपची सरशी!
प्रभाग १९(ब) मध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून अर्चना अनिल कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र ऐनवेळी त्यांनीही अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या रुचिता मुग्धा लोंढे बिनविरोध निवडून आल्या. ही माघार शिवसेनेच्या संघटनात्मक कमकुवतपणाचे प्रतीक मानली जात आहे.
शेकापची माघारदर्शना भोईर यांचा मार्ग मोकळा!
प्रभाग १९(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागेसाठी भाजपच्या स्टँडिंग नगरसेविका दर्शना भगवान भोईर यांच्या विरोधात शेकापच्या दिव्या चांगदेव बहिरा होत्या. मात्र त्यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे दर्शना भोईर बिनविरोध निवडून आल्या. शेकापची ही माघार पक्षातील अंतर्गत गोंधळ दर्शवणारी ठरली.
प्रभाग २० : वडीललेकीची एकत्र माघार
प्रभाग २०(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेसाठी भाजपचे अजय बहिरा यांच्या विरोधात शेकापचे चांगदेव बहिरा आणि दिव्या बहिरा यांचे अर्ज होते. मात्र गुरुवारी वडीललेकीने दोन्ही अर्ज मागे घेतल्याने अजय बहिरा बिनविरोध निवडून आले. तर २०(ब) मध्ये भाजपच्या डॉ. प्रियांका तेजस कांडपिळे यांच्या विरोधातील काँग्रेसच्या रूपाली शिंदे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे दोन जागा बिनविरोध झाल्या.
भाजपमध्ये उत्साह, प्रदेशाध्यक्षांचे संकेत खरे!
दरम्यान, आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी सकाळी मेळाव्यात दिलेले आणखी उमेदवार बिनविरोध निवडून येतील हे संकेत प्रत्यक्षात उतरले असून पनवेलमध्ये भाजपने निवडणुकीआधीच मानसिक आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
ममता म्हात्रेंचा निर्विवाद विजय
प्रभाग क्रमांक १८ अ मधून माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या पत्नी ममता म्हात्रे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या विरोधामध्ये सेजल श्याम खडकबाग यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. शुक्रवारी मशालीच्या या उमेदवाराने आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले. त्यामुळे प्रीतम म्हात्रे निवडणूक लढवत नसले तरी त्यांच्या पत्नीचा निर्विवाद विजय झाला.
महाविकास आघाडीवर नामुष्की!
शेकाप, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरेगट यांच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीच्या रणनीतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ज्यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला, त्यांनीच पाठ फिरवल्याचा आरोप होत आहे. भाजपने ‘उमेदवारांची टोळी’ सक्रिय केल्याचा आरोप विरोधक करत असले, तरी वास्तवात संघटनात्मक ताकद आणि नियोजनाचा विजय भाजपने मिळवल्याचे चित्र आहे.