अजित पवारांसह चार हिर्‍यांचा अकाली अस्त

By Raigad Times    29-Jan-2026
Total Views |
 lekh
 
उमाजी म. केळुसकर | ज्येष्ठ पत्रकार | 28 जानेवारी 2026 हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात एका भीषण आणि कधीही न विसरता येणार्‍या जखमेप्रमाणे कोरला गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे, रोखठोक आणि कामाचा झपाटा असलेले नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एका दुर्दैवी विमान अपघातात अंत झाला आणि अवघा महाराष्ट्र सुन्न झाला.
 
नियती किती क्रूर असू शकते, याचा प्रत्यय या घटनेने पुन्हा एकदा आणून दिला आहे. मुंबईहून बारामतीकडे झेपावलेले ते विमान केवळ पाच देह घेऊन जात नव्हते, तर त्यात लाखो कार्यकर्त्यांच्या आशा, बारामतीचा विकास आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एका वादळी पर्वाचे अस्तित्व सामावलेले होते. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. बारामती गाठण्यापूर्वीच काळाने घाला घातला आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा नावाचा एक वटवृक्ष कोसळला.
 
ही घटना केवळ एका राजकीय नेत्याचा मृत्यू नाही, तर प्रशासकीय शिस्त आणि कामाच्या वेगाचा एक अध्याय कायमचा संपणे आहे. अजित पवार म्हणजे एक असे व्यक्तिमत्व होते, ज्यांच्याबद्दल कोणाचेही दुमत असले तरी त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल कोणालाही शंका नव्हती पहाटे पाच वाजल्यापासून कामाला सुरुवात करणारा हा नेता, मंत्रालयात शिस्त लावणारा हा लोकप्रतिनिधी आणि शब्दाचा पक्का असलेला हा माणूस आज आपल्यात नाही, यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे.
 
राजकारणात अनेक चढउतार पाहिले, अनेक संघर्ष केले, पण कधीही हार न मानणारा हा नेता मृत्यूसमोर हतबल ठरला. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरून काढता येणारी नाही. केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे, तर प्रशासकीय वर्तुळातही त्यांच्या निधनाने एक मोठी शांतता पसरली आहे. अजित पवार हे केवळ सत्तेसाठी राजकारण करणारे नेते नव्हते, तर जमिनीवर उतरून काम करणारे आणि जनतेचे प्रश्न सोडवणारे हक्काचे दादा होते.
 
या भीषण अपघातात केवळ अजित पवारच गेले नाहीत, तर त्यांच्यासोबत असलेले इतर चार तरुण जीवही काळाच्या पडद्याआड गेले. विदीप जाधव, सुमित कपूर, शांभवी पाठक आणि पिंकी माळी या चारही व्यक्ती आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत होत्या. विदीप जाधव, जे गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवारांचे सावलीसारखे अंगरक्षक होते, त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपले कर्तव्य पार पाडले.
 
एका निष्ठावान पोलीस अधिकार्‍याचा असा अंत होणे, हे पोलीस दलासाठीही मोठे नुकसान आहे. त्याचप्रमाणे, अवघ्या 25 वर्षांची शांभवी पाठक आणि 29 वर्षांची पिंकी माळी यांसारख्या कर्तबगार मुलींनी आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्यापूर्वीच जगाचा निरोप घेतला. पायलट सुमित कपूर यांचा प्रदीर्घ अनुभवही त्या क्षणी कामी आला नाही, हे पाहून तांत्रिक प्रगती आणि मानवी कौशल्ये निसर्गाच्या कोपापुढे किती तोकडी आहेत, याची जाणीव होते.
 
या चारही कुटुंबांवर कोसळलेला दुःखाचा डोंगर हा अजित पवारांच्या कुटुंबाच्या दुः खापेक्षा कमी नाही. अजित पवारांची ओळख म्हणजे त्यांचे स्पष्टवक्तेपण. त्यांना जे वाटायचे ते ते तोंडावर बोलायचे. राजकारणातील साखरेसारखा गोडवा त्यांच्या बोलण्यात नसला, तरी त्यांच्या कामात मात्र एक प्रकारची पारदर्शकता आणि वेग होता. बारामतीचा कायापालट करणार्‍या या नेत्याने संपूर्ण राज्याला विकासाची एक नवी दिशा दिली. वित्त मंत्री म्हणून त्यांनी मांडलेले अर्थसंकल्प आणि घेतलेले धाडसी निर्णय महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे ठरले.
 
प्रशासनावर त्यांची असलेली पकड इतकी मजबूत होती की, अधिकारी त्यांच्या एका शब्दाखातर कामाला लागायचे. फाईलवर कधीही धूळ साचू न देणारा हा नेता होता. आज जेव्हा आपण त्यांच्या कार्याचा आढावा घेतो, तेव्हा जाणवते की, राजकारणातील गणितांपेक्षाही त्यांचे लोकहिताचे गणित अधिक पक्के होते. विमान प्रवासातील तांत्रिक बिघाड किंवा हवामानाची प्रतिकूलता यामुळे हा अपघात झाला असावा, असे प्राथमिक अंदाज आहेत. मात्र, अशा मोठ्या नेत्याचा आणि पाच जणांचा बळी घेणार्‍या या घटनेची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
 
व्हीएसआर कंपनीच्या त्या विमानाबाबत सर्व सुरक्षेचे निकष पाळले गेले होते का? तांत्रिक तपासणीत काही त्रुटी होत्या का? हे प्रश्न आता विचारले जातीलच. परंतु, या प्रश्नांच्या उत्तराने गेलेले प्राण परत येणार नाहीत. या घटनेने व्हीआयपी प्रवासाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. महाराष्ट्राने यापूर्वीही अनेक मोठे नेते विमान किंवा हेलिकॉप्टर अपघातात गमावले आहेत. ही मालिका कधी थांबणार, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.अजित पवारांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
 
आपल्या कार्यकर्त्यांना बळ देणारा आणि संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभा राहणारा हा नेता होता. त्यांच्या निधनाची बातमी वार्‍यासारखी पसरली आणि बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला. लोक रडत होते, कारण त्यांनी आपल्या हक्काचा माणूस गमावला होता. राजकारणातील मतभेद विसरून सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली, हेच त्यांच्या कर्तृत्वाचे मोठेपण आहे.
 
ज्या घड्याळाच्या चिन्हावर त्यांनी आयुष्यभर राजकारण केले, त्याच घड्याळाच्या काट्यांनी त्यांच्या आयुष्याची वेळ इतकी लवकर संपवावी, हा दैवदुर्विलास आहे. या शोकांतिकेचा दुसरा पैलू म्हणजे त्या चार सामान्य कुटुंबांचे झालेले नुकसान. पिंकी माळीच्या वडिलांनी व्यक्त केलेली भावना काळजाला घर पाडणारी आहे. आपल्या मुलीने या क्षेत्रात करिअर करावे, ही वडिलांची इच्छा होती, पण त्याच इच्छेने तिचा बळी घेतला, ही सल त्यांना आयुष्यभर बोचत राहील.
 
शांभवी पाठक हिचे वडील सैन्यदलात होते, आपल्या मुलीने आकाशाला गवसणी घालावी हे स्वप्न त्यांनी पाहिलेहोते, पण ते स्वप्न अधुरेच राहिले. विदीप जाधव यांच्या मुलांच्या डोक्यावरून पित्याचे छत्र हरवले. या सर्व व्यक्ती केवळ स्टाफ नव्हत्या, तर ते आपापल्या घराचे आधारस्तंभ होते. त्यांच्या बलिदानाची नोंदही इतिहासात अजित पवारांच्या नावाशेजारीच घेतली जाईल. महाराष्ट्र आज एका थोर सुपुत्राला मुकला आहे. अजित पवारांची उणीव राज्याला पावलोपावली भासत राहील.
 
मंत्रालयातील ते पाच वाजताचे रिपोर्टिंग, बैठकींमधील ती जरब आणि विकासकामांचा तो धडाका आता पुन्हा पाहायला मिळणार नाही. एका मोठ्या वादळाचा शांततेत अंत झाला आहे. नियतीने महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील एक तेजस्वी तारा निखळला आहे. ही घटना आपल्याला सांगून जाते की, आयुष्य किती क्षणभंगुर आहे. जो माणूस कालपर्यंत राज्याच्या भविष्याचे नियोजन करत होता, तो आज आठवणींचा भाग झाला आहे.
 
अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या त्या चारही मृतांना श्रद्धांजली वाहताना शब्द अपुरे पडतात. महाराष्ट्राच्या प्रगतीत अजित पवारांनी दिलेले योगदान सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल. त्यांच्या निधनाने केवळ एक पक्ष किंवा एक कुटुंब ओरखले गेले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राच्या या लाडक्या लेकाला आणि त्यांच्या सहकार्‍यांना भावपूर्ण श्रद्धांजली!