तंत्रज्ञानाच्या युगात आपण अशा एका टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत, जिथे कल्पना आणि वास्तव यातील धूसर रेषा आता पूर्णपणे पुसली जात आहे. खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने आपल्या शैक्षणिक प्रवासात ह्युमन रोबोट शिक्षक समाविष्ट करून केवळ एका नवीन उपकरणाचे अनावरण केलेले नाही, तर महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला एका नव्या युगाची साद घातली आहे.
हे पाऊल तांत्रिक प्रगतीचे लक्षण असले तरी त्यामागे दडलेली शैक्षणिक उद्दिष्टे आणि भविष्यातील शक्यतांचा विचार करणे आज अत्यंत गरजेचे झाले आहे. ज्यावेळी एखादे यंत्र वर्गामध्ये शिक्षकाची भूमिका साकारते, तेव्हा ते केवळ माहितीचे हस्तांतरण करत नाही, तर मानवी प्रगतीचा एक नवा अध्याय लिहित असते. शिक्षण ही प्रामुख्याने एक जिवंत आणि मानवी प्रक्रिया आहे, जिथे संस्कार, ज्ञान आणि संवाद यांचा त्रिवेणी संगम असतो.
मात्र, बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये केवळ पारंपरिक पद्धतींना चिकटून राहणे आता पुरसे ठरणार नाही. आजचा विद्यार्थी हा डिजिटल नेटिव्ह आहे, जो जन्मापासूनच इंटरनेट आणि प्रगत गॅझेट्सच्या सान्निध्यात वाढला आहे. अशा परिस्थितीत, वर्गातील शिकवण्याची पद्धत जर कालबद्ध पद्धतीने बदलली नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची ओढ कमी होण्याची भीती असते. या आव्हानाचा विचार करूनच शिक्षणात तंत्रज्ञानाचा असा धाडसी प्रयोग होणे आवश्यक आहे.
रोबोट शिक्षक केवळ धडे देणार नाही, तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरेही देणार आहे, हे या प्रयोगाचे सर्वात मोठे यश आहे. शिक्षण म्हणजे केवळ माहितीची साठवणूक नसून शंकांचे प्रभावी निरसन होणे होय. जेव्हा एखादा रोबोट विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना संवाद साधून उत्तरे देतो, तेव्हा मुलांमधील कुतूहल अधिक वेगाने जागृत होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सचा हा प्रत्यक्ष वापर शैक्षणिक क्रांतीचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. आजवर आपण या गोष्टी केवळ पुस्तकात वाचल्या किंवा चित्रपटात पाहिल्या होत्या.
मात्र, जेव्हा विद्यार्थी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर एका रोबोटला चालताना, बोलताना आणि विषयांची मांडणी करताना पाहतात, तेव्हा त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मोठी मदत होते. विद्यार्थ्यांकडून सादर केले जाणारे विविध एआय मॉडेल्स आणि थ्री-डी प्रिंटरसारख्या प्रगत सोयीसुविधा शाळांमध्ये उपलब्ध होणे, हे शाळा आता केवळ पाठ्यपुस्तके शिकवणारी केंद्र राहिली नसून, भविष्यातील संशोधक घडवणारी प्रयोगशाळा बनत असल्याचे संकेत आहेत. अशा आधुनिक पायाभूत सुविधांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना जागतिक दर्जाच्या स्पर्धेसाठी सज्ज करता येते.
विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा स्वीकार ज्या उत्साहाने केला आहे, त्यावरून हे स्पष्ट होते की नवीन पिढी बदलांसाठी पूर्णपणे तयार आहे. त्यांच्यासाठी हे केवळ एक यंत्र नसून ते एक माहितीचे दालन आहे, जे चोवीस तास त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तत्पर राहू शकते. अशा प्रयोगांमुळे वर्गातील वातावरण अधिक सजीव आणि नाविन्यपूर्ण बनते, ज्यामुळे शिक्षणाची प्रक्रिया रटाळ न राहता एक आनंददायी अनुभव ठरते.
तथापि रोबोट शिक्षक वर्गात येण्यामुळे काही मूलभूत आणि तात्विक प्रश्नही उपस्थित होतात. यंत्र हे अखेर मानवनिर्मित असते. शिक्षकाची जागा घेताना त्याला मानवी संवेदना, प्रेम आणि सहानुभूती या गोष्टींचे स्वरूप कसे देता येईल, हा एक सखोल संशोधनाचा विषय आहे. शिक्षक हा केवळ माहितीचा स्त्रोत नसून तो विद्यार्थ्याचा मार्गदर्शक, मित्र आणि तत्त्वज्ञ असतो. विद्यार्थ्याच्या डोळ्यातील भीती ओळखून त्याला धीर देणे किंवा त्याच्या चेहर्यावरील आनंद पाहून त्याला दाद देणे, हे एका सजीव शिक्षकालाच शक्य आहे.
त्यामुळे रोबोट शिक्षक हा मानवी शिक्षकाला पूर्णपणे पर्याय कधीच ठरू शकणार नाही, तर तो एक पूरक साधन म्हणून काम करेल. शिक्षकाने फळ्यावर खडूने लिहिणे आणि रोबोटने डिजिटल स्क्रीनवर माहिती मांडणे, यामध्ये जो भावनिक दुवा असतो, तो कायम राखण्याचे आव्हान येणार्या काळात शिक्षण क्षेत्रासमोर असेल. तंत्रज्ञानस्नेही शिक्षण संस्थांची आज देशाला मोठी गरज आहे. यामुळे शिक्षणातील तोचतोचपणा दूर होण्यास मदत होईल.
गणितातील क्लिष्ट सूत्रे किंवा विज्ञानातील गुंतागुंतीचे प्रयोग जेव्हा एखादा रोबोट प्रत्यक्ष सिम्युलेशनद्वारे दाखवेल, तेव्हा ते विद्यार्थ्यांच्या स्मरणात अधिक काळ टिकतील. विशेषतः महानगरांपासून ग्रामीण भागापर्यंत अशा तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण होणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान जेव्हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचते, तेव्हाच त्याची खरी फलश्रुती होते. या निमित्ताने शिक्षण क्षेत्रात ज्या हायटेक क्रांतीची बीजे रोवली गेली आहेत, ती भविष्यात वटवृक्षाचे रूप धारण करतील अशी आशा करण्यास जागा आहे.
येणार्या काळात प्रत्येक शाळेत असे तंत्रज्ञान पोहोचल्यास, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक समृद्ध होईल. माहिती गोळा करण्याचे कष्ट यंत्रावर सोपवून शिक्षक मुलांच्या चारित्र्य निर्मितीवर जास्त भर देऊ शकतील. हे डिजिटल स्थित्यंतर भारताला जागतिक ज्ञानगुरू बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे वळण ठरेल. केवळ साक्षरता नव्हे, तर तांत्रिक साक्षरता हाच प्रगतीचा खरा मंत्र आहे.
शिक्षण संस्थांचा हा बदलता दृष्टिकोन कौतुकास्पद आहे. केवळ पदव्या देणारे कारखाने चालवण्यापेक्षा विद्यार्थ्यांना भविष्याभिमुख करणे ही काळाची गरज बनली आहे. व्यवस्थापन आणि शिक्षकांनी जेव्हा अशा बदलांचे स्वागत केले, तेव्हा त्यामागे एक दूरदृष्टी काम करत असते. अनेकदा नवीन तंत्रज्ञान आले की एक प्रकारची भीती किंवा संकोच समाजात जाणवतो. रोबोट आल्यामुळे शिक्षकांचे महत्त्व कमी होईल का, अशा चर्चांना उधाण येते. पण वास्तव हे आहे की, तंत्रज्ञान माणसाचे काम सोपे करते, त्याचे स्थान हिरावून घेत नाही.
उलट, तांत्रिक आणि माहितीपर कामे रोबोटवर सोपवल्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर आणि त्यांच्या भावनिक गरजांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक वेळ मिळू शकेल. शिक्षणात रोबोटचा प्रवेश हे एक आश्वासक पाऊल आहे. हे पाऊल केवळ एका संस्थेपुरते मर्यादित न राहता, संपूर्ण शिक्षण व्यवस्थेने त्यातून प्रेरणा घेणे आवश्यक आहे. आपण अशा माहितीच्या महाजालात राहत आहोत, जिथे ज्ञानाचे स्वरूप दर सेकंदाला बदलत आहे. अशा वेळी जर आपली शिक्षण पद्धती स्थिर राहिली, तर आपण जागतिक प्रगतीपासून दूर फेकले जाऊ.
रोबोट शिक्षक हे एका नवीन संस्कृतीचे प्रतीक आहे जी संस्कृती चौकस आहे, प्रयोगशील आहे आणि भविष्यातील आव्हानांना भिडण्यासाठी सज्ज आहे. विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेले कुतूहल हीच अशा प्रयोगांची सर्वात मोठी यशस्विता आहे. जिज्ञासा हाच ज्ञानाचा पाया आहे आणि तंत्रज्ञान जर ही जिज्ञासा प्रज्वलित करत असेल, तर त्याचे स्वागतच व्हायला हवे. आपण अपेक्षा करूया की, येणार्या काळात तंत्रज्ञान आणि मानवी मूल्ये यांचा योग्य समन्वय साधून एक अशी पिढी घडेल, जी केवळ यंत्रांना समजून घेणार नाही, तर त्यांच्या साह्याने मानवजातीचे कल्याण साधेल.
हा प्रवास केवळ यंत्रमानवापुरता मर्यादित नसून तो मानवी बुद्धिमत्तेच्या अमर्याद विस्ताराचा प्रवास आहे. या परिवर्तनामुळे भविष्यातील शाळा केवळ भिंतींच्या आत न राहता, त्या ज्ञानाचे अथांग आकाश बनतील. तंत्रज्ञान ही आपली शक्ती आहे, तिचे आपण खुल्या मनाने स्वागत केले पाहिजे.