पेण । पेण नगरपरिषदेच्या इनडोर गेम हॉलमध्ये सुरु असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या कामासाठी ठेवण्यात आलेल्या पंचधातू साहित्याची चोरी केल्याप्रकरणी पेण पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली आहे. या प्रकरणात सुमारे 1 लाख 21 हजार 900 रुपये किमतीच्या ब्रास (पितळ) वस्तूंची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरात उभारण्यात येणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे काम पेण नगरपरिषदेमधील इनडोर गेम हॉलमध्ये सुरू आहे. या पुतळ्यासाठी ठेवण्यात आलेल्या ब्रास या पंचधातूच्या वस्तू दि. 14 जानेवारीच्या मध्यरात्री ते 15 जानेवारीच्या पहाटेच्या सुमारास अज्ञात इसमाने गोडाऊनमधील उघड्या खिडकीतून आत प्रवेश करुन चोरुन नेल्या.
याप्रकरणी चिंचपाडा येथील फिर्यादीने पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल व पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाकडून सुरु करण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा शोध घेण्यात आला. सखोल चौकशीनंतर विलास चव्हाण (वय 21) आणि राम विजय गवळी उर्फ रामा रेड्डी (वय 37), दोघेही आयटीआय कॉलेजच्या बाजूच्या झोपडपट्टीतील रहिवासी, यांना ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान चोरांनी सदर चोरीसह यापूर्वीही अशा स्वरुपाच्या चोरी केल्याची कबुली दिली असून चोरी केलेला पंचधातूचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या गुन्ह्यात त्यांचा आणखी एक साथीदार सहभागी असल्याचेही निष्पन्न झाले आहे. ही कारवाई रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण, राजेश पाटील, प्रकाश कोकरे, अजिंक्य म्हात्रे, सचिन, सुशांत भोईर, अमोल म्हात्रे, गोविंद तलवारे व संदिप शिंगाडे यांनी यशस्वी कामगिरी बजावली.