अलिबाग बीच शो शासन स्तरावरुन करण्यासाठी पाठपुरावा करणार -आमदार महेंद्र दळवी

By Raigad Times    02-Jan-2026
Total Views |
 Alibag
 
अलिबाग । रायगड समुद्र किनारे खासकरुन अलिबाग, मुरुड हे पर्यटकांसाठी आकर्षणाची ठिकाणे आहेत. दिवसेंदिवस येथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. येणार्‍या पर्यटकांसाठी ‘अलिबाग बीच शो’सारखे कार्यक्रम राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून केले जावेत, यासाठी आपण पाठपुरावा करु, असे प्रतिपादन अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी केले.
 
बुधवारी ‘अलिबाग बीच शो’ कार्यक्रमात ते बोलत होते. ‘रायगड टाइम्स’च्या या उपक्रमाचे त्यांनीदेखील तोंडभरुन केले. तत्पूर्वी, कार्यक्रमाचे आयोजक तथा ‘रायगड टाइम्स’चे संपादक राजन वेलकर यांनी ‘अलिबाग बीच शो’सारखे उपक्रम जिल्ह्यातील तीन-चार ठिकाणी राबवावेत, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. तोच धागा पकडत, आ. दळवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
 
स्थानिक कला, कलाकार आणि संस्कृती जपण्यासाठी तसेच पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी अशाप्रकारचे कार्यक्रम जिल्ह्यात होणे आवश्यक आहे. “अलिबाग बीच शो”सारखे उपक्रम शासन स्तरावर राबविण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची विनंती त्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे केली. अलिबाग बीच शोचे हे सलग तिसरे वर्ष आहे. दर शनिवाररि ववार हा उपक्रम राबवला जातो.
 
विशेषतः 31 डिसेंबर रोजी एक वेगळा, सांस्कृतिक शो आयोजित करण्यात येतो. त्यामुळे अलिबागमध्ये येणार्‍या देश-विदेशातील पर्यटकांना याचा आनंद घेता आला, तसेच स्थानिक कलाकारांना खर्‍या अर्थाने व्यासपीठ मिळाले असल्याचे आ. दळवी म्हणाले. हा कार्यक्रम भविष्यातही अधिक भव्य स्वरुपात साजरा होईल आणि महाराष्ट्रासह राज्याबाहेरील पर्यटकही अलिबागमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येतील, असा आशावाद आ.दळवी यांनी व्यक्त केला.