जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी...‘अलिबाग बीच शो’सारखे उपक्रम आवश्यक

कोकण आयुक्त विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन

By Raigad Times    02-Jan-2026
Total Views |
alibag
 
अलिबाग | अलिबाग येथील समुद्र किनार्‍यावर आयोजित ‘अलिबाग बीच शो’चे कोकण आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी कौतुक केले आहे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, त्याठिकाणी पर्यटकांच्या मनोरंजनासाठी अशाप्रकारचे शो झाले पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 
नववर्षाच्या स्वागतासाठी ‘रायगड टाइम्स’ आणि ‘रायन फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी, ३१ डिसेंबर रोजी रात्री अलिबाग समुद्रकिनार्‍यावर ‘अलिबाग बिच शो’चे आयोजन करण्यात आले होते. या शानदार कार्यक्रमाचे उद्घाटन कोकण आयुक्त विजय सूर्यवंशी, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आले.
 
alibag
 
यावेळी अलिबागचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड.महेश मोहिते, आरसीएफचे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर नितीन हिरडे, नगरसेवक अंकित बंगेरा, राजू साळूंखे आदी मान्यवर उपस्थित होते. आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी बोलताना, रायगडातील किनार्‍यावर मोठ्याप्रमाणात पर्यटक येत असतात, शासकीय पातळीवर पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण होत आहे.
 
पर्यटकदेखील वाढत आहेत. दिवसभर स्पोर्ट अ‍ॅक्टीव्हिटी केल्यानंतर संध्याकाळी पर्यटकांसाठी काहीतरी मनोरंजन आवश्यक होते. ‘रायगड टाइम्स’चे संपादक राजन वेलकर यांनी राबविलेली ‘अलिबाग बीच शो’ ही त्यामुळे अतिशय सुंदर संकल्पना आहे. या शोसाठी अलिबाग नगरपालिकेने चांगला हातभार लावला पाहिजे, अशी अपेक्षाही सूर्यवंशी यांनी बोलून दाखवली. यावेळी पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनीही रायगडकरांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या.
देशातील सर्वांधिक ‘हॅपनिंग’ जिल्हा म्हणून रायगडचा लौकिक-जिल्हाधिकारी जावळे
अलिबाग | देशातील सर्वाधिक ‘हॅपनिंग’ जिल्हा म्हणून रायगडचा लौकिक आहे. मुंबई, महाराष्ट्रच नव्हे देशभरातून नागरिक नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात दाखल होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित "अलिबाग बीच शो” या कार्यक्रमात ते बोलत होते.
 
alibag
 
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, रायगड जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून दैनंदिन बदलत्या परिस्थितीनुसार नव्या संधी निर्माण होत आहेत. उद्योग, पर्यटन, पायाभूत सुविधा आणि नागरी सोयीसुविधांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास वेगाने होत आहे. या विकासप्रक्रियेमुळे येत्या काळात रायगड जिल्हा केवळ राज्यासाठीच नव्हे तर देशासाठीही दिशा दाखविणारा ठरेल आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मोलाची भूमिका बजावेल.
 
उद्योग क्षेत्रात गुंतवणूक, पर्यटनाच्या दृष्टीने नैसर्गिक सौंदर्य व ऐतिहासिक वारसा, पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणारे उपक्रम तसेच मानवी विकासाच्या दृष्टीने सर्वसमावेशक नियोजन या सर्व बाबींमध्ये रायगड जिल्हा आघाडीवर असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत पुढे जाणे हेच जिल्ह्याचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी २०२६ हे नवीन वर्ष रायगड जिल्ह्यासाठी सुख-समाधानाचे, समृद्धीचे व भरभराटीचे ठरो, अशा नववर्षाच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या.