अलिबाग | पनवेल, नवी मुंबई व ठाणे महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यातील २६३ अधिकारी व कर्मचार्यांना नियुक्ती करण्यात आल्याने जिल्ह्यातील महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये तसेच तलाठी कार्यालयांमध्ये अधिकार्यांअभावी सध्या शुकशुकाट पहायला मिळत आहे.
रायगड जिल्ह्यातून निवडणूक कामासाठी ८ उपजिल्हाधिकारी, ५ तहसीलदार, १५ नायब तहसीलदार, २६ सहाय्यक महसूल अधिकारी, ४१ महसूल सहाय्यक, २७ मंडळ अधिकारी आणि ११० तलाठ्यांची पनवेल व नवी मुंबई परिसरात नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल विभागात बोगस नोंदी टाळण्यासाठी अभिलेखांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. या प्रणालीत तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांची बायोमेट्रिक ओळख अनिवार्य असते.
वहिवाट दावे, ३२-ग चे दावे, हक्कसोडपत्रांवरील स्कीप आदेश, वर्ग दोनची जागा वर्ग एकमध्ये रुपांतर, तसेच कलम १५५ अंतर्गत चूक दुरुस्ती यांसारख्या महत्त्वाच्या प्रकरणांसाठी तहसीलदारांचा अंगठा आवश्यक असतो. मात्र निवडणूक कामासाठी तहसीलदार व नायब तहसीलदार बाहेरगावी नियुक्त झाल्याने ही सर्व कामे रखडली आहेत. तलाठी कार्यालयांतील कामकाजही गंभीरपणे बाधित झाले असून, महसूल संबंधित दाखले, फेरफार, नोंदणी प्रक्रिया व नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित राहिल्या आहेत.
अधिकारी व कर्मचारी जागेवर नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, "निवडणूक कामासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असते. संबंधित जिल्ह्यात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यास शेजारील जिल्ह्यांतून अधिकारी व कर्मचारी अधिगृहीत केले जातात. त्यानुसार रायगड जिल्ह्यातून ही नियुक्ती करण्यात आली आहे”, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.