नवी मुंबई । भाजपला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव नाही तर नरेंद्र मोदी यांचे नाव द्यायचे आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. नवी मुंबईत निवडणूक प्रचारासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टिका केली.
एकीकडे नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी जोर धरत असताना दुसरीकडे काँग्रेसने गंभीर आरोप केला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी यांचे नाव द्यायचे आहे, भाजपला हेच करायचे आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले. दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भूमिपुत्र समाजाच्यावतीने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका जाहीर करण्यात आली आहे.
या नामांतरणाबाबत महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहांनी एकमताने ठराव तीन वर्षांहून अधिक कालावधी उलटूनही हा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे भूमिपुत्र समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आचारसंहिता संपल्यानंतर मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल आणि मागणी पूर्ण होईपर्यंत मुंबईतून न हटण्याचा निर्धार खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी व्यक्त केला आहे.