तळोजा टीसीईटीपीमध्ये घोटाळा! अध्यक्षांसह नऊ सदस्य दोषी

७३ लाख ८९ हजारांची भरपाई करण्याचे सहाय्यक निबंधकांचे आदेश

By Raigad Times    11-Jan-2026
Total Views |
kalamboli
 
कळंबोली | तळोजा येथील टीसीईटीपी को-ऑपरेटीव्ह सोसायटीमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अध्यक्षांसह नऊ व्यवस्थापकीय समिती सदस्य दोषी आढळले आहेत. या दोषी सदस्यांनी संस्थेला झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई रोख स्वरूपात करण्याचे आदेश महाड येथील प्राधिकृत अधिकारी सहाय्यक निबंधक तुषार लाटणे यांनी दिले आहेत.
 
२०१८ मध्ये तत्कालीन व्यवस्थापकीय समितीने बेकायदा खर्च केल्याचा आरोप करतचे माजी अध्यक्ष संदीप डोंगरे यांनी शासनाकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच प्रकल्प संपूर्णपणे एमआयडीसीकडे हस्तांतरित करुन चालवावा, अशीही त्यांची मागणी होती.
 
या मागणीच्या अनुषंगाने चौकशीचे आदेश देण्यात आले होते. सहाय्यक निबंधक तुषार लाटणे यांनी केलेल्या चौकशीअंती तत्कालीन व्यवस्थापकीय समितीने सोसायटीच्या निधीचा अपहार व गैरविनियोग केल्याचे स्पष्टपणे सिद्ध झाले आहे. चौकशी अहवालानुसार एकूण ७३ लाख ८९ हजार १७८ इतकी रक्कम गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित सदस्यांची नावे व प्रत्येकास दिलेल्या रकमेचे तपशील अहवालात नमूद करण्यात आले आहेत.
 
या आदेशामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीत मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार केवळ एका संस्थेपुरता मर्यादित नसून, सहकारी क्षेत्रातील पारदर्शकता, जबाबदारी आणि सदस्यांच्या पैशांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित असल्याचे माजी अध्यक्ष संदीप डोंगरे यांनी सांगितले. दरम्यान, तत्कालीन अध्यक्ष सतीश शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तरी सर्व कामकाज पारदर्शक पद्धतीनेच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.