पनवेल | पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळंबोली परिसर पूर्णतः राजकीय केंद्रबिंदू ठरला असून येथील प्रचाराला अभूतपूर्व वेग आला आहे. चार प्रभागांतील हाय व्होल्टेज लढतीमुळे कळंबोलीत एकामागोमाग एक राज्यस्तरीय नेत्यांच्या सभा आणि रॅली होत असून येत्या १२ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोडपाली येथे संवाद मेळावा घेणार असल्याने प्रचाराचे वातावरण आणखी तापणार आहे.
पनवेल महानगरपालिका निवडणुकीत कळंबोली परिसर निर्णायक ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. या भागात महायुतीसमोर महाविकास आघाडीने जोरदार आव्हान उभे केल्याने प्रचाराची तीव्रता कमालीची वाढली आहे. परिणामी, इतर भागांच्या तुलनेत कळंबोलीत सर्वाधिक सभा, रॅली आणि नेत्यांचे दौरे होत आहेत. कळंबोलीत एकूण चार प्रभाग असून या चारही प्रभागांमध्ये थेट महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगला आहे. प्रभाग क्रमांक सात आणि आठ येथे विशेष चुरस असून काट्याची टक्कर अपेक्षित आहे.
प्रभाग क्रमांक सातमधून आमदार प्रशांत ठाकूर यांचे विश्वासू सहकारी व स्थायी समितीचे माजी सभापती अमर पाटील निवडणूक रिंगणात आहेत. या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी आव्हान उभे केले आहे. प्रभाग क्रमांक आठमध्येही हाय व्होल्टेज फाईट होत असून प्रभाग क्रमांक १० मध्ये चुरस आहे. तर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शेतकरी कामगार पक्ष विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगला आहे. या चारही प्रभागांतून एकूण १६ नगरसेवक निवडले जाणार असल्याने कळंबोलीचे राजकीय महत्त्व अधिक वाढले आहे.
या पार्श्वभूमीवर दोन्ही आघाड्यांकडून राज्यस्तरीय नेत्यांना प्रचारासाठी मैदानात उतरवले जात आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी कळंबोलीत येऊन भाजप-महायुतीचा प्रचार केला. त्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेली रॅली रोडपाली बस डेपो येथे सांगता झाली. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची जाहीर सभा पार पडली.
आपल्या खास शैलीतील भाषणातून त्यांनी कळंबोलीकरांना संबोधित करत महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनाचे आवाहन केले. शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रचार रॅली व सभा घेत महाविकास आघाडीची ताकद दाखवून दिली. त्यांच्या सभेमुळे येथील राजकीय वातावरण अधिक तापले. दरम्यान, येत्या १२ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोडपाली येथे संवाद मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यात ते पनवेलमधील नागरी प्रश्न, विकासकामे, पायाभूत सुविधा आणि भविष्यातील नियोजनावर थेट नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
प्रचाराचा हा वेगळा पॅटर्न महायुतीकडून राबवण्यात येत असून त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील हे निवडणूक रिंगणात उतरल्याने लढत अधिक तीव्र झाली आहे. एकूणच, पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने कळंबोली हा निर्णायक भाग ठरत असून पुढील काही दिवसांत होणार्या सभा, संवाद मेळावे आणि प्रचार कार्यक्रमांमुळे येथील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे