श्रीवर्धन । श्रीवर्धन तालुक्यात मोकाट घोडे व गुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोन दिवसांपूर्वी श्रीवर्धन भट्टीचा माळ बस थांब्याजवळ एका तरुणाचा गंभीर अपघात झाला आहे. घोडा रस्त्याच्या मध्ये आल्यामुळे ही दुर्घटना घडली. श्रीवर्धन तालुका सध्या पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध झाला आहे.
त्यामुळे समुद्रकिनार्यावर घोडागाडी, घोडेस्वारीसाठी खूप मोठ्या प्रमाणात घोडेमालकांनी घोडे आणून ठेवले आहेत. परंतु दिवसभर घोड्यांकडून काम करून घेऊन झाल्यानंतर सायंकाळच्या वेळेस हे घोडे मोकाट सोडण्यात येतात. याकडे स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
श्रीवर्धन-हरिहरेश्वर मार्गावर तसेच श्रीवर्धन-दांडगुरी मार्गे बोर्ली मार्गावर, म्हाबदे घाट परिसरामध्ये अनेक घोडे रस्त्यावर मुक्त संचार करताना आढळून येतात. याठिकाणीच्या नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे अर्ज विनंती करून मोकाट घोड्यांचा बंदोबस्त करावा, याबाबत मागणी केली होती. परंतु सदर घोडे मालकांवरती कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी एका पर्यटकाच्या वाहनाने एका घोड्याला धडक दिली.
त्या पर्यटकाकडून घोडे मालकांनी पैसे वसूल केले. परंतु आता एक तरुण गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलवावे लागले आहे. सदर अपघातामध्ये घोडा देखील मृत झाल्याचे सांगण्यात येते. परंतु या घोड्याचा मालक कोण? याबाबत अद्याप कोणीही पुढे आलेले नाही. तर दुसरीकडे या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव सलमान दिवेकर असे असून तो श्रीवर्धन जीवना येथील राहणारा आहे.
त्याच्या अपघाताला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अपघाताच्या ठिकाणाहून घोडा रातोरात गायब करण्यात आला. त्यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पूर्वी श्रीवर्धन नगरपरिषदेच्या मालकीचा गुरांचा कोंडवाडा होता. या ठिकाणी गुरे आणून लोक देत असत. परंतु या जागेवरती नगरपरिषद प्रशासनाने पर्यटक निवास बांधल्यामुळे सध्या कोणत्याही प्रकारच्या कोंडवाड्याची सोय श्रीवर्धन परिसरात उपलब्ध नाही.
ग्रामीण भागातही मोकाट गुरांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गुरे बाळगणारे शेतकरी मुंबई येथे काम धंद्यासाठी निघून गेल्यामुळे सदरची गुरे मोकाट फिरत असतात. याचा त्रास अनेकांना सहन करावा लागतो. तरी तालुका प्रशासनाने व श्रीवर्धन नगरपरिषदेने मोकाट घोडे व गुरांबाबत योग्य ती उपाययोजना करावी आणि त्यांच्या मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी जनतेमधून होत आहे.