अलिबाग | आगामी जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीसोबतच लढणार असल्याची भूमिका शेकाप नेते जयंत पाटील यांनी स्पष्ट केली. शेकापक्षाने ज्यांना मोठे केले, त्यांनी गद्दारी केली. त्या गद्दारांना शून्य बनविण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये आहे.
जिल्हा परिषदेवर पुन्हा लाल बावटा फडकवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.शेकापची रायगड जिल्हा चिटणीस मंडळ आणि नवनिर्वाचित पदाधिकारी, बैठकीचे आयोजन चेंढरे येथील पीएनपी नाट्यगृहात बुधवारी (३ सप्टेंबर) करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जयंत पाटील बोलत होते. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
मतदान केंद्रस्तरावर काम करून मतदारापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. इंडिया आघाडीसह महाविकास आघाडीतर्फे आपण लढणार आहोत. जिल्हा परिषदेवर आपली सत्ता कायम राहिल, या दृष्टीने मोठ्या जिद्दीने, मनात चीड ठेवून काम करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. शेकापची जिल्ह्यात साडेचार लाख मते आहेत. हे निवडणुकांमध्ये दाखवून दिले आहे.
आगामी काळात वेगळा पॅटर्न घेऊन काम करण्याचा मानस आहे. ग्रुप व बुथ स्तरावर मतदारापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या आघाड्यांच्या पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साडेचार हजारहून अधिक पदे निवडली आहेत. पक्षाने प्रत्येकाला चांगले काम करण्याची संधी दिली आहे. पक्षाचे महत्व तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. घर स्तरावर जाऊन प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केल्यास ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी सोपी ठरणार आहे. विरोधकांना धडकी भरेल, अशा पध्दतीने कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रशासकीय राजवटीचे विसर्जन करण्यासाठी सज्ज व्हा-माजी आ.बाळाराम पाटील
रायगड जिल्हा परिषदेसह पनवेल महानगर पालिकेचा प्रारुप आराखडा जाहीर झाला आहे. आपल्याला ताठ मानेने उभे राहण्यासाठी या निवडणुका जिंकाव्या लागणार आहेत. त्यानुसार कार्यकर्त्यांनी तयारी करायची आहे. सध्या असलेल्या प्रशासकीय राजवटीचे विसर्जन करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शेकाप नेते बाळाराम पाटील पाटील यांनी केले.
जिल्ह्यामध्ये बाहेरून येणार्यांचा ओघ वाढणार आहे. तिसर्या मुंबईच्या माध्यमातून रोहापर्यंत जिल्हा स्थिरावणार आहे. त्यामुळे जिल्हयातील १५ तालुक्यांना बुथस्तरावर निटनेटके काम करणे आवश्यक आहे, असे माजी आ. बाळाराम पाटील यांनी सांगितले.