महाड । भोर-महाड मार्गावरील शिरगाव हद्दीत रविवारी मध्यरात्री साडेदोनच्या सुमारास भीषण अपघात घडला. मोरीसाठी रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात कार कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे रस्त्याच्या अपूर्ण कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मृत व्यक्तीचे नाव राहुल विश्वास पानसरे (वय 45, रा. घाटकोपर, मुंबई) असे असून, राहुल देवराम मुटकुले (वय 32) हे गंभीर जखमी झाले आहेत. हे दोघे गणपतीपुळे दर्शनासाठी जात होते.भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोयोटा कंपनीची कार भोरहून महाडच्या दिशेने जात असताना शिरगाव परिसरात पावसामुळे आणि धुक्यामुळे रस्ता नीट न दिसल्याने कार रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खोदलेल्या व झाकल्या न गेलेल्या मोरीच्या खड्ड्यात कोसळली.
अपघात इतका भीषण होता की पानसरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुटकुले गंभीर जखमी झाले. घटनास्थळी तत्काळ भोर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्यासह पोलिसांचे पथक दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ, पोलिस पाटील आणि वक्रतुंड क्रेन सर्व्हिसच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून भोर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला, तर जखमीला महाड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. गेल्या सहा-सात महिन्यांपासून या मार्गावरील रुंदीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, अनेक ठिकाणी मोर्या बसवण्यासाठी खड्डे खोदले गेले आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.