पावसाची बॅटींग सुरूच.. शेतकरी हवालदिल...

By Raigad Times    29-Sep-2025
Total Views |
 Alibag
 
कर्जत । तालुक्यात भाताच्या पिके घेणार्‍या शेतकर्‍यांना यावर्षी पावसाने सतत झोडपले आहे. मे महिन्याचे पहिल्या आठवड्यात सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. आता तर शेतात उभी असलेली पिके वादळी वार्‍यासह सुरू असलेल्या पावसामुळे जमिनीवर कोसळली असून नष्ट होताना दिसत आहेत.
 
गेल्या दोन दिवसांपासून कोसळणार्‍या सततधार पावसाने शेतकर्‍यांची वाट लावली आहे. कापणीस आलेली भातशेती अक्षरशः भुईसपाट झाली असून शेतकर्‍यांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकर्‍यांच्या मेहनतीची वर्षभराची पिके क्षणात पाण्याखाली गेल्याने तालुक्यात हताशा आणि वेदनेचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील वारे, कळंब, गरूडपाडा, पोशिर, जामरुख, टेम्भेरे, खांडस, वेणगाव, बारणे गौरकामथ अशा बहुतांश भागात भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
 
कापणीसाठी सज्ज झालेली भातशेती चिखलात कोसळली असून शेतांच्या बांधांना भगदाड पडल्याने माती वाहून गेली आहे. सध्या शेतकरी डोळ्यादेखत आपली शेती उद्ध्वस्त होताना बघत आहेत; पण काहीही करता येत नाही, अशी असहाय्य परिस्थिती आहे. वाढती मजुरी, महाग झालेली बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके या खर्चाचा डोंगर उचलून शेतकर्‍यांनी कसेबसे पिक उभे केले होते; पण नैसर्गिक आपत्तीने त्यांच्या स्वप्नांची राख केली आहे.