पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पनवेल धावले , विविध सामाजिक संस्थांचा पुढाकार; साहित्य जमा होण्यास सुरुवात

By Raigad Times    29-Sep-2025
Total Views |
 Panvel
 
पनवेल । मराठवाडा आणि इतर भागांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्याचा निर्धार पनवेल परिसरातील विविध सामाजिक संस्थांनी केला असून, अन्नधान्य, किराणा, कपडे व शालेय साहित्य देण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
 
पनवेलकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत साहित्य जमा करण्यास सुरुवात केली आहे, आणि लवकरच ते पूरग्रस्त भागात पोहोचवण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील पिके, माती आणि जनावरे पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहून गेल्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाले आहेत. या संकटकाळात विविध सामाजिक घटकांकडून मिळणारी मदत पूरग्रस्तांसाठी आधार ठरत आहे.
 
राज्य सरकारनेही हतबल शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांसाठी तातडी 2215 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली असून, ही मदत लवकरच शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवली जाईल, असे त्यांनी सांगितले. यासोबतच मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातूनही शेतकर्‍यांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील तुळजापूर, पंढरपूर यासारख्या देवस्थानांनीही पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली आहे.
 
त्याचप्रमाणे पनवेलच्या सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. कामोठे येथील एकता सामाजिक संस्थाचे अध्यक्ष अमोल शितोळे यांनी सर्वप्रथम मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले. त्यानुसार दत्तूशेठ पाटील विद्यालयात विविध वस्तू जमा करण्यास सुरुवात झाली आहे. दिशा महिला मंचच्या अध्यक्ष निलम आंधळे आणि उपाध्यक्ष विद्या मोहिते यांनीही पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आवाहन केले, ज्याला समाजात प्रतिसाद मिळत आहे.
 
तसेच डॉ. कांचन पाटीलवड गावकर आणि शहाजी भोसले यांनी मदतीसंदर्भात संदेश सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. करंजाडे येथील संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थामार्फत शालेय साहित्य जमा करून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे, असे संस्थापिका वैशाली जगदाळे यांनी सांगितले. याशिवाय माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनीही पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.