पावसामुळे भातशेती आडवी उरणमध्ये घरांची पडझड

By Raigad Times    29-Sep-2025
Total Views |
uran 
 
उरण । दोन दिवसांची उसंत घेतल्यानंतर परतीच्या पावसाने शनिवारी (27 सप्टेंबर) रात्री पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. वार्‍यासह झालेल्या पावसामुळे उरण तालुक्यातील बहुतांश भातशेती आडवी पडली असून अनेक रहिवाशांची घरं कोसळली आहेत. या परिस्थितीत मदतीचा हात देणारे आपत्कालीन व्यवस्थापन मात्र रविवारी दिवसभर कोमात गेल्यासारखे दिसून आली.
 
उरण तालुक्यात शनिवारी रात्रीपासून सुरु झालेल्या वादळी पावसामुळे कापणीला आलेली भातशेती आडवी पडली आहे. त्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड होऊन सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिरनेर गावासह अनेक भागांमध्ये शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. शासकीय आपत्कालीन यंत्रणा रविवारी (28 सप्टेंबर) नुकसानग्रस्त भागात फिरकली नसल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
 
चिरनेरमधील रहिवाशांच्या घरांची पडझड व भातशेतीचे नुकसान पाहूनही आपत्कालीन व्यवस्थापन बांधावर न आल्याने शेतकरी शासनाविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत. भारतीय हवामान विभागाने 27 ते 30 सप्टेंबर 2025 या काळात राज्यातील कोकण व इतर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मात्र उरण व रायगड जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांचा गोंधळ सुरूच असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागात मदत पोहोचवावी, अशी मागणी शेतकरी संतोष ठाकूर यांनी केली आहे.
कर्जत तालुक्यातील शेतकरी आज अक्षरशः उघड्यावर आले आहेत. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. या विदारक परिस्थितीतून शेतकरी जनआंदोलनाच्या मार्गावर जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. - दशरथ मुने, शेतकरी, बारणे
आमच्या राजनाला कालवा असलेल्या परिसरातील किमान एक हजार एकर जमिनीमधील भाताची पिकाची कापणी न करता तसेच सोडून द्यावे लागले होते. यावर्षी तरी शासनाने मदतीचा हात द्यावा - विनय वेखंडे शेतकरी, वदप कर्जत
कळंब तसेच गरूडपाडा परिसरातील भातशेती अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. तलाठी आणि कृषी अधिकारी यांनी तात्काळ पंचनामे करून आम्हाला नुकसानभरपाई मिळवून द्यावी. - शिकांत कमलाकर तुरे, शेतकरी, कळंब, कर्जत