पेण । रायगड जिल्हा पोलीस दलाची सुत्रे हाती घेतल्यानंतर गुन्हेगारांना भांगडा करायला लावणार्या रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल पेण येथील श्री अंबिका माता मंदिरात गरबा खेळताना दिसल्या. आँचल दलाल यांचे हे वेगळे रुप पाहून नागरिकांनाही सुखद धक्का बसला.
पोलीस आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी त्यांनी नवरात्रौत्सवाचा योग साधला आहे. पेण विभागातील नागरिकांना भेडसावणार्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी गर्दीच्या ठिकाणाची निवड केली. पेण येथील जागृत देवस्थान श्री अंबिका माता मंदिरात शनिवारी (27 सप्टेंबर) रात्री त्यांनी मंदिरात दाखल होत नागरिकांशी संवाद साधला .“नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझे अलिबाग येथील दालन सदैव खुले आहे”, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पेण विभागीय पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल, पेणचे पोलीस निरीक्षक संदिप बागुल, वाहतूक पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ, दादर सागरीचे पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राह्मणे, वडखळचे पोलीस निरीक्षक जाधव तसेच उपनिरीक्षक निलेश राजपूत उपस्थित होते. श्री अंबिका मंदिर ट्रस्टच्या आग्रहानंतर शिस्तबद्ध व जबाबदारीने काम करणार्या या महिला अधिकार्याने जेव्हा गरब्यात स्वतः सहभाग घेतला, तेव्हा उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
“खाकी फक्त कायदा-सुव्यवस्थेसाठीच नाही तर जनतेशी हृदयाने जोडलेली ताकद आहे,” हे त्यांनी पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिले. कार्यक्रमानिमित्त मंदिर ट्रस्टतर्फे बाबुलाल साखळचंद जैन, जयंतीलाल साखळचंद जैन, राहुल बाबुलाल जैन, चिराग दिनेशकुमार जैन, यश मनोज जैन यांनी आँचल दलाल यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.