अलिबागमध्ये रेंटल बाईकविरोधात रिक्षा चालक आक्रमक

By Raigad Times    26-Sep-2025
Total Views |
 Alibag
 
अलिबाग । पर्यटन नगरी अलिबागमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर रेंटल बाईकच्या व्यवसायामुळे अलिबागमधील परवानाधारक रिक्षाचालक मालक आक्रमक झाले आहेत. त्यांनी अलिबाग पोलीस स्टेशनला निवेदन दिले असून रेंटल बाईकवर कारवाईची मागणी केली आहे.
 
रिक्षाचालकांच्या मते, शहरात केवळ दोन परवानाधारकांना दाह ते बारा बाईक भाड्याने देण्याची परवानगी आहे. मात्र प्रत्यक्षात हेच परवानाधारक 40 ते 50 बाईक रस्त्यावर सोडत असून, इतर अनेकजण कोणतेही परवाने न घेता बेकायदेशीरपणे रेंटल बाईकचा धंदा सुरू ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकारामुळे अलिबागच्या पारंपरिक रिक्षा व्यवसायावर संकट ओढावले असून आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
 
माजी उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे व शेकाप तालुका प्रमुख सुरेश घरत यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाचालक प्रतिनिधी मंडळाने अधीक्षक आँचल दलाल तसेच पोलीस निरीक्षक किशोर साळे यांना निवेदन दिले. यावेळी अलिबाग ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी अफजल सय्यद, अमीन मुल्ला, पप्पू पडावे, शरद राऊत, स्वप्नील नाईक, मन्सूर आगा आणि संदीप म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. निवेदनात रिक्षाचालक संघटनेने इशारा दिला आहे.