रायगडमध्ये बनावट नोटांचे रॅकेट उघड; पावणेचार लाखांच्या नोटा जप्त ; माणगाव, म्हसळा श्रीवर्धन येथील तीनजण अटकेत

By Raigad Times    26-Sep-2025
Total Views |
 MANGOV
 
माणगाव । जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात बनावट चलनी नोटांचे मोठे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. याप्रकरणी तीनजणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 3 लाख 80 हजाराच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
 
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गोरेगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली. माणगाव टेमपाले येथील मुफस्सिर उर्फ मिनी अब्दुल राशिद खानदेशी याच्या घरातून बनावट नोटा ठेवण्यात आल्या असून म्हसळा तालुक्यातील निगडीपाब रे येथील सुनील बाळाराम मोरे अणि मेहबुब उलडे (रा. बोर्लीपंचतन, ता. श्रीवर्धन) असे तिघेजण एका खर्‍या नोट्यांच्या बदल्यात तीन खोट्या नोटा देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
 
शनिवारी (20 सप्टेंबर) त्यानंतर रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गोरेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. कारवाईनंतर फरार झालेला मेहबुब उलडे (रा. बोर्लीपंचतन, ता. श्रीवर्धन) याला सोमवारी रात्री दिघी येथून ताब्यात घेण्यात आले. या रॅकेटमधील आरोपींनी वीस, पन्नास आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करून त्या बाजारात मिसळण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
 
गणेशोत्सवापासून हा विषय चर्चेत होता. काही व्यापार्‍यांची फसवणूक झाल्याचेही समजते. हुबेहुब खर्‍या नोटांसारख्या दिसणार्‍या या बनावट नोटांमुळे सामान्य नागरिकांची दिशाभूल झाली होती. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी संपूर्ण रॅकेटचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक नागरिकांनी संशयास्पद नोटा त्वरित पोलिसांकडे जमा कराव्यात, असे आवाहनही गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांनी केले आहे. गोरेगाव पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखा पुढील तपास करत असून संपूर्ण रॅकेटची साखळी उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.