कर्जत । कर्जत तालुक्यातील लोभेवाडी गावात पुन्हा एकदा करणी करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गावाच्या प्रवेशद्वारावर रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी भाज्या, लिंबू, गुलाल, लोखंडी पिळदार पट्टी आणि विविध वस्तू टाकून काहीतरी काळी जादू अथवा करणी केल्याची शंका व्यक्त होत आहे.
या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे. गावात जाणार्या रस्त्याच्या टोकावर मूठभर माती टाकून त्यावर भाज्या, लिंबू चार कोपर्यात कापलेले, जीरा, मोहरी, राख अशा वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. भाज्यांवर गुलाल टाकून वशीकरण किंवा करणी करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त होत आहे. सकाळी ग्रामस्थांच्या नजरेस हा प्रकार आल्यानंतर गावात भीती आणि गोंधळ निर्माण झाला.
काहींच्या मते हा प्रकार गुप्तधन मिळवण्यासाठी केला असावा, तर काहींनी यामागे करणी किंवा वशीकरणाचे षड़यंत्र असल्याचा आरोप केला. गावातील काही वयोवृद्धांनी याआधीही अशाच प्रकारचे प्रकार घडल्याचे सांगितले . काही वर्षांपूर्वी स्मशानभूमीत अज्ञातांनी मध्यरात्री दफन केलेला मृतदेह बाहेर काढून पूजा केल्याचा प्रकारही घडला होता, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आणखी वाढले आहे.
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन पथकाने लोभेवाडीत भेट देऊन गावकर्यांना मार्गदर्शन केले. जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोर्हाडे, सदस्य आकाश कांबळे, अभिजित बोर्हाडे यांनी या अंधश्रद्धेच्या प्रकारांवर जनजागृतीची गरज असल्याचे सांगितले. पोलीस प्रशासनानेही या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.