मुंबई । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. जानेवारी अखेरपर्यंत राज्यातील जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडण्याच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकींसाठी वापरली जाणार आहे. निवडणूक विभाग आणि पंचायत समितीनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. मतदारांमध्ये नोंदीतील चुका दुरुस्त करण्यासाठी हरकती व सूचना 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत दाखल करता येणार आहेत.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, प्रारुप मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणे चमतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातील. नवीन नावांचा समावेश, नावे वगळणे किंवा पत्त्यांमध्ये बदल यासाठी आयोगाकडून थेट बदल केले जाणार नाहीत.
मतदारांकडून दाखल झालेल्या हरकती व सूचनांच्या आधारावर, लेखनिकांकडून होत असलेल्या तांत्रिक चुका, मतदाराचा चुकून निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असून प्रभागाच्या यादीत नाव नसणे अशा दुरुस्त्या केल्या जातील. या प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी तयार केली जाईल आणि मतदान केंद्रानिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाईल. राज्यातील नागरिकांनी आपले मतदार माहिती तपासून हरकती व सूचना वेळेत दाखल करून आपल्या मताचा हक्क सुनिश्चित करण्याचे आवाहन आयोगाकडून केले आहे.