पाऊस रखडला; पर्यटन व्यवसायावर मंदीचे सावट

By Raigad Times    24-Sep-2025
Total Views |
 shreewardhan
 
श्रीवर्धन । यावर्षी कोकणातील पावसाळ्याने विक्रमी सुरुवात केली. साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाळ्याला सुरुवात होत असते, मात्र यावर्षी 20 मे रोजीच पावसाने हजेरी लावल्याने पर्यटन हंगामावर मोठा परिणाम झाला असून हॉटेल, कॉटेज व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले.
 
पावसाची लवकर सुरुवात झाल्याने तो लवकर संपेल, अशी अपेक्षा पर्यटन व्यावसायिकांना होती. मात्र सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पोहोचूनही पाऊस थांबायचे नाव घेत नाही. परिणामी श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र आहे.
मासेमारी सुरु, पर्यटन मात्र ठप्प
श्रीवर्धन तालुक्यात मासेमारी आणि पर्यटन हे नागरिकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. 1 ऑगस्ट रोजी मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर मासेमारी सुरू झाली होती. मात्र वातावरणातील बदलांमुळे समुद्र खवळल्याने काही काळ ती पुन्हा बंद झाली होती. मागील काही दिवसांपासून मासेमारी पुन्हा जोमात सुरू झाली असली तरी पर्यटन व्यवसाय मात्र कोलमडला आहे.
नवरात्रोत्सवातही पावसाचा धुडगूस
दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या काळात पाऊस ओसरतो आणि पर्यटन हंगामाला सुरुवात होते. पण यंदा नवरात्रोत्सव सुरू झाल्यानंतरही मुसळधार पाऊस सुरूच आहे. यामुळे गरबा नृत्यासारख्या सांस्कृतिक उपक्रमांवर परिणाम झाला असून भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पर्यटकांची आतुरतेने वाट
श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धनचा समुद्रकिनारा, हरिहरेश्वरचे काळभैरव मंदिर, दिवेआगर येथील सोन्याच्या गणपतीचे मंदिर ही ठिकाणे नेहमीच पर्यटकांचे आकर्षण असतात. हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सने पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी पूर्ण तयारी केली असली तरी पर्यटक मात्र अद्याप हजेरी लावत नाहीत. व्यवसायिकांना आता महिन्याच्या अखेरीस पाऊस ओसरण्याची आणि पर्यटन व्यवसाय पूर्ववत होण्याची आशा आहे.