मुरुड । भाजपची मुरुड तालुक्याची संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली. त्यामुळे या तालुक्याची जबाबदारी काही काळासाठी पक्षाचे जिल्ह्यातील नेते सतीश धारप यांच्यावर सोपवण्यात आली आहे अलिबाग-मुरुड विधानसभा निवडणुकीपासून संघटनेत विस्कळीतपणा आला होता.
या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांनी यांनी सोमवारी (22 सप्टेंबर) एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सतीश धारप, जिल्हा सरचिटणीस अॅड. महेश मोहिते उपस्थित होते. या बैठकीत पक्षातील विविध विषयांवर चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या भूमिकेविरोधात काम केल्यामुळे निलंबीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे निलंबन रद्द करुन पुन्हा सक्रिय करण्याबाबतही चर्चा झाली.
तसा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवण्याचा निर्णय झाला. मात्र पक्षाची शिस्त मोडणार्यांना पक्षात घेताना त्यांना काही काळ कोणतेही पद देऊ नये, असेही ठरविण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून समजते.यावेळी मुरुड तालुका कार्यकारिणीच बसखास्त करण्यात आली. त्यामुळे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.