आरक्षण बचावसाठी कोळी, आदिवासी बांधवांचा एल्गार ; जिल्हाधिकारी कार्यालयावर 30 सप्टेंबरला धडक

By Raigad Times    22-Sep-2025
Total Views |
 Alibag
 
अलिबाग । राज्यातील धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणात हक्क सांगण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कोळी आणि आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. या मागणीला विरोध करण्यासाठी येत्या 30 सप्टेंबर रोजी अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
 
रायगड जिल्हयातील कोळी आणि आदिवासी समाजाच्या विविध संघटना, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, यांची एकत्रित बैठक शनिवारी (20 सप्टेंबर) अलिबाग येथे पार पडली. या बैठकीत राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्यावर सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा झाली. त्यातच अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणात बंजारा आणि धनगर समाज वाटा मागतो आहे. याला बैठकीत कडाडून विरोध करण्यात आला. आमचा कुणालाही आरक्षण द्यायला विरोध नाही.
 
परंतु घटनेतील तरतूदींनुसार आमच्या वाट्याला जे आरक्षण आले आहे त्यात आम्ही कुणालाही वाटेकरी होऊ देणार नाही, अशी भूमिका सर्वांनीच मांडली. रायगड जिल्हा परीषदेचे माजी समाजकल्याण समित ीसभापती दिलीप भोईर यांनी अनुसूचित जमातीची बाजू ठामपणे मांडली. कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे. परंतु आमच्यावरच कुणी अन्याय करत असेल आणि आमच्या हिश्शाचे कुणी मागत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आजही आमचा आदिवासी, कोळीबांधव अनेक समस्यांचा सामना करीत, कष्टप्रद जीवन जगत आहे.
 
अशावेळी आमच्या ताटात हात घालण्याचा प्रयत्न कुणी करू नये, असा इशारा दिलीप भोईर यांनी दिला. याविरोधात आंदोलन छेडण्यावर सर्वांचेच एकमत झाले. चर्चेअंती 30 सप्टेंबर ही तारीख मोर्चासाठी निश्चित करण्यात आली आणि मोर्चासंदर्भात नियोजन करण्यात आले. यासाठी वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करून प्रत्येक समितीवर जबाबदारी निश्चित करण्यात आली. मोर्चा यशस्वी व्हावा, यासाठी गावोगावी बैठका घेऊन अनुसूचित जमातीच्या समाजाला याबाबत अवगत करण्यात येणार आहे.
 
त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कामाला लावण्याचे ठरवण्यात आले. माजी तहसीलदार मोरेश्वर आडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस आदिवासी कातकरी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान नाईक, दिलीप भोईर, माजी तहसीलदार रवी पाटील, ऑफ्रोह संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष जलदीप तांडेल, अलिबाग तालुका ठाकूर समाजाचे धर्मा लोभी, गजानन पाटील, आदिंसह आदिवासी, कोळी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.