अलिबाग । आजपासून देशभरात सर्वत्र शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सवापाठोपाठ येणार्या या उत्सवाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी घरोघरी तसेच मंदिरांमध्ये जोरदार तयारी सुरु आहे.
तर रात्रीचा रासगरबा आणि दांडियासाठी तरुणाई सज्ज झाली आहे.घटस्थापनेपासून चालणार्या या उत्सवाचा उत्साह सर्वत्र पहायला मिळणार असून देवीची पूजा, आरती, गरबा असे कार्यक्रम आयोजीत केले आहेत. अनेक सार्वजनिक उत्सव मंडळे देवीच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत. देवीच्या प्रतिष्ठापनेबरोबरच जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये सार्वजनिकसह खासगी असे 5 हजार 106 मूर्ती, घट आणि प्रतिमा असे स्थापना करण्यात येणार आहे.
तर 3 ठिकाणी रावण दहन करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात आज, 22 सप्टेंबर रोजी 1 हजार 387 ठिकाणी देवींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यामध्ये 1 हजार 198 सार्वजनिक, तर 189 खासगी कार्यक्रमांचा समावेश आहे. देवींच्या प्राणप्रतिष्ठेबरोबरच जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये 3 हजार 527 घटांची स्थापना करण्यात येणार आहे. यामध्ये 244 सार्वजनिक, तर 3 हजार 283 खासगी घटांचा समावेश आहे.
192 देवींच्या फोटोंची स्थापना करण्यात येणार असून, यामध्ये सार्वजनिक 175, तर खासगी 17 ठिकाणांचा समावेश आहे. त्याचबरोबर 899 ठिकाणी देवींच्या मिरवणुका निघणार आहेत, नवरात्रौत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याचा त्यांच्या हद्दीत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले.
पावसाचे सावट
यंदाच्या नवरात्र उत्सवावर पावसाचे सावट पहायला मिळत आहे. मागील 4 दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. कधी जोरदार तर कधी हलक्या स्वरुपाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे उत्सवाच्या तयारीत बाधा येत आहे.
रात्रीची आरती आणि दांडिया यामध्ये पावसाचा अडसर येऊ नये, यासाठी काही ठिकाणी वॉटरप्रुफ मंडप टाकण्याचीही तयारी सुरू आहे. दरम्यान, आजपासून सुरु होणार्या नवरात्र उत्सवाच्या खरेदीसाठी संध्याकाळी बाजारात गर्दी झाली होती.