सुधागड । सरकारी अधिकारी- कर्मचार्यांच्या कार्यप्रणालीवर अनेकदा लोक नाराजी व्यक्त करतात. मात्र, सुधागड तालुक्यातील पाच्छापूर गावात वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेल्या ग्रामविकास अधिकारी राहुल सुदाम कांबळे यांच्या बदलीविरोधात गावकरी एकवटले आहेत.
ग्रामस्थांनी शेकडो सह्यांसह निवेदन सादर करून त्यांची बदली थांबवण्याची मागणी गटविकास अधिकार्यांकडे केली आहे. गावकर्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सप्टेंबर 2019 पासून राहुल कांबळे ग्रामविकास अधिकारी म्हणून पाच्छापूर येथे कार्यरत आहेत.
त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे ग्रामपंचायतीतील एकही काम रखडलेले नाही. ते नेहमी वेळेवर कार्यालयात हजर राहून ग्रामस्थांची कामे तत्परतेने पूर्ण करतात. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावकर्यांना मिळवून देण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील राहिले आहेत.
विशेष म्हणजे, ग्रामपंचायत हद्दीतील कोणाकडूनही त्यांनी कधीही आर्थिक लाभाची मागणी केली नाही, किंवा कोणालाही कामासाठी अडवले नाही. त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायत कार्यालय सुरळीतपणे सुरू राहिल्याने त्यांची बदली होऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
सदर ग्रामविकास अधिकारी हे अतिशय प्रामाणिक व कर्तव्यदक्षपणे आपले काम करत आहेत. याशिवाय येथील सरपंच यांच्या विरोधात गावकर्यांनी अधिकाराचा गैरवापर याबाबत तक्रार केली असून 39/1 अंतर्गत कार्यवाही सुरू आहे. आता अखेरची सुनावणी होणार आहे. अशावेळी ग्रामविकास अधिकारी यांची बदली होण्यासाठी काहीजण दबाव आणत आहेत. जर त्यांची बदली झाली तर कागदपत्रांमध्ये फेरफार होण्याची भीती आहे. त्यामुळे जर बदली झाली तर सर्व ग्रामस्थ सुधागड-पाली पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करतील. - उमेश तांबट, ग्रामस्थ