पनवेल । खारघर परिसरात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणार्या आठ आफ्रिकन नागरिकांविरोधात खारघर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आफ्रिकन नागरिकाला अटक केली असून इतर सात जणांवर तसेच त्यांना राहण्यासाठी फ्लॅट भाड्याने देणार्या दोन फ्लॅट मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर सेक्टर-27 मधील चौधरी ईलाईट को- ऑप. सोसायटीत राहणार्या इफियानी युगोचुक्यु या आफ्रिकन नागरिकाच्या कागदपत्रांची पोलिसांनी तपासणी केली असता, त्याच्याकडे पासपोर्ट आणि व्हिसा नसल्याचे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे, तर तो ज्या फ्लॅटमध्ये राहात होता त्या फ्लॅट मालकाने सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर सी फॉर्ममध्ये माहिती नोंदवता त्याला भाड्याने फ्लॅट दिल्याचेही उघड झाले.
परिणामी पोलिसांनी इफियानी युगोचुक्यु याला तात्काळ अटक केली. दरम्यान, खारघर सेक्टर-34 ए मधील फरशीपाडा येथील फौजिया मेन्शन इमारतीत राहणार्या इतर सात आफ्रिकन नागरिकांच्या कागदपत्रांचीही पोलिसांनी कसून तपासणी केली. यातील अनेकांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईनंतर पोलिसांनी खारघर परिसरातील सर्व घरमालकांना सूचित केले आहे की, परदेशी नागरिकांना फ्लॅट किंवा घर भाड्याने देण्यापूर्वी त्यांच्या कागदपत्रांची कायदेशीर पडताळणी करणे बंधनकारक आहे. तसेच सरकारच्या अधिकृत पोर्टलवर सी फॉर्ममध्ये माहिती भरणे अनिवार्य आहे, अन्यथा अशा प्रकरणात घरमालकांवरही कारवाई करण्यात येईल.