महाड । महाड तालुक्यातील वरंडोळी गावात बुधवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने ग्रामस्थांत भितीचे वातावरण पसरले आहे. रात्री सुमार साडे त्रनऊ वाजता गावातील रहिवासी राम शिर्के यांच्या अंगणात अचानक बिबट्याने प्रवेश करत त्यांच्या पाळीव कुत्र्यावर झडप घालत त्याला खेचून नेले.
घटनेच्या वेळी घरातील सदस्यांनी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकून बाहेर धाव घेतली असता बिबट्याला कुत्र्यावर हल्ला करताना प्रत्यक्ष पाहिलं. या घटनेनंतर गावात प्रचंड घबराट पसरली असून विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक दहशतीखाली आहेत.
वन विभागाला घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने परिसरात गस्त घातली व रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना फटाके फोडण्याच्या सूचना दिल्या, जेणेकरुन बिबट्याचा वावर गावाजवळ होणार नाही. यापूर्वीही नातेखिंड व गोंडाळे रोड परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने जाणवत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
बिबट्याच्या सततच्या वावरामुळे शेतकर्यांना शेतात जाणे अवघड झाले असून, शाळकरी मुलंही भीतीमुळे शाळेत जाण्यास घाबरु लागली आहेत. गावकर्यांनी वन विभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्याची, गस्त वाढविण्याची व जनजागृती मोहिमा राबविण्याची मागणी केली आहे.