महाड शहरात चिकन गुनियाचे रुग्ण; नगरपरिषद अ‍ॅक्शन मोडवर

By Raigad Times    19-Sep-2025
Total Views |
 mahad
 
महाड । महाड शहरातील चवदार तळे परिसरात गेल्या महिन्याभरापासून वाढलेल्या चिकन गुनियाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाड नगरपरिषद प्रशासन, आरोग्य विभाग आणि ग्रामीण रुग्णालय अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. शहरात साथ पसरू नये, यासाठी स्वच्छता मोहिम, डासफवारणी, तसेच कंटेनर तपासणीसह विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
 
नगरपरिषद आरोग्य विभाग प्रमुख अक्षय साळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी काही इमारतीलगत फवारणी झाली होती. मात्र गुरुवारी सकाळपासून संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. आकाशगंगा इमारतीमध्ये डासांच्या आळ्या सापडल्यानंतर रहिवाशांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
mahad
 
शुक्रवारी (19 सप्टेंबर) ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय पथक नागरिकांना भेटून प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आवश्यक प्राथमिक काळजीबाबत माहिती देणार आहे. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी शहरातील गॅरेजेस आणि पंक्चर दुकानांमध्ये साचलेल्या पाण्याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. उशिरा का होईना, परंतु नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी सुरू केलेल्या या मोहिमेबाबत शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.