नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही , शिवसेना ठाकरे गटाचा अदानीच्या कार्यालयावर मोर्चा

By Raigad Times    17-Sep-2025
Total Views |
 panvel 1
 
पनवेल । नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी करतानाच स्थानिक भूमिपुत्रांना व्यवसाय व नोकरीत प्रथम प्राधान्य मिळणार नसेल तर 30 सप्टेंबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेने (ठाकरे गट) दिला आहे.
 
मंगळवारी (16 सप्टेंबर) आपल्या विविध मागण्यांसाठी ठाकरे शिवसेनेतर्फे पनवेलमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला.मोर्चाची सुरुवात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आली. उपनेते सुरेंद्रनाथ (बाळ) माने व बबन पाटील यांच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, सुरेंद्र म्हात्रे, महिला उत्तर रायगड जिल्हा संघटीका सुवर्णा जोशी, दिपश्री पोटफोडे, लीना गरड, पराग मोहिते यांच्यासह पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना व मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
 
कार रॅलीच्या माध्यमातून मोर्चा विमानतळाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना पोलिसांनी चिंचपाडा गेटजवळ अडविला. शिष्टमंडळाने अदानी समूहाचे कॉर्पोरेट इन्चार्ज चेतन सुरवसे व सिक्युरिटी हेड नितीन सावंत यांची भेट घेतली. अदानी समूहाचे मुख्य अधिकारी कॅप्टन शर्मा यांच्यासोबत बैठक होणार होती, परंतु ते अनुपस्थित राहिल्याने शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला. “अदानी समूहाने शिवसेनेचा अपमान केला आहे.
 
निवेदन न देता आम्ही निघून जात आहोत, पण पुढील आंदोलने आमच्या पद्धतीने होतील. आता अदानी समूहाला मातोश्रीवर येऊनच भेट घ्यावी लागेल,” असा सज्जड इशारा सुरेंद्रनाथ (बाळ) माने यांनी दिला. येत्या 30 सप्टेंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र स्थानिक भूमिपुत्रांना न्याय न देता हे उद्घाटन होऊ देणार नाही, असा इशारा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर व जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी दिला. “भूमिपुत्रांच्या हक्काच्या लढ्यात शिवसेना पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरेल,” असा इशारा यावेळी देण्यात आला.