न्यायालयाच्या बनावट आदेशाची प्रत करून फसवणूक , खारघर येथील वकिलाला गुन्हा दाखल करुन अटक!

By Raigad Times    17-Sep-2025
Total Views |
 panvel 1
 
पनवेल । न्यायालयाच्या बनावट आदेशाची प्रत तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पनवेल शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही कारवाई 12 सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. सदर प्रकरणात फिर्यादी लाधवजी पटेल हे बांधकाम व्यावसायिक असून वाशी येथे राहतात.
 
त्यांच्या कंपनीला व्यवसायासाठी उलवे येथील सेक्टर 17 मधील सुमारे 10.50 गुंठे जमीन खरेदी करायची होती. मात्र या जमिनीचे मूळ मालक मदन घरत यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांमध्ये अल्पवयीन मुले असल्याने व्यवहारासाठी ‘मायनर सर्टिफिकेट’ आवश्यक होते.
 
जुलै 2025 मध्ये सागर घरत याने लाधवजी पटेल यांना सांगितले की, त्याच्या ओळखीचे अ‍ॅड. व्ही. के. शर्मा हे प्रमाणपत्र लवकर मिळवून देतील आणि त्यासाठी एक लाख रुपये खर्च येईल. यानुसार 10 सप्टेंबर रोजी अ‍ॅड.शर्मा यांनी अल्पवयीन मुलांच्या ‘मायनर सर्टिफिकेट’साठी न्यायालयाच्या न्यायाधीशांची बनावट सही व शिक्का असलेली बनावट आदेशाची प्रत तयार केली आणि ती सागर घरत यांच्यामार्फत पटेल यांना दिली.
 
न्यायालय व फिर्यादी दोघांचीही फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पनवेल शहर पोलिसांनी अ‍ॅड.व्ही. के. शर्मा (रा.खारघर) यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला व त्यांना अटक केली. या प्रकरणाचा तपास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक सचिन पोवार करत आहेत.