महाड | औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांकडून, नियमानुसार उत्पादन, कायद्यांचे पालन, प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना, कामगार सुरक्षा या बाबींची अंमलबजावणी केली जात आहे की नाही याची तपासणी मोहीम महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यामार्फत सुरु करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी या औद्योगिक वसाहतीमधून जेरबंद करण्यात आलेला नक्षलवादी, बंद कारखान्याचा वापर करुन सुरु असलेला अंमली पदार्थ तयार करण्याचा उघडकीस आलेला प्रकार या पार्श्वभूमीवर या तपासणीला महत्व प्राप्त झाले आहे. १० सप्टेंबर रोजीही अशीच तपासणी मोहिम राबविण्यात आली. पीडी लाईट इंडस्ट्रीज, जेट इन्सुलेशन लिमिटेड, श्रीपाद केमिकल्स आणि शौर्य एंटरप्रायझेस या चार कारखान्यांची तपासणी या मोहिमेदरम्यान करण्यात आली.
कारखान्यातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्याच बरोबर कामगारांची पडताळणी, कारखान्यात तयार होणारे उत्पादन, त्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल आदी बाबीदेखील या मोहिमेदरम्यान तपासण्यात आल्या. या तपासणी मोहिमेमध्ये औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाचे संचालक राजशेखर कडीवाल, निलेश पाटील, सहाय्या कामगार आयुक्त आर. जी. रुमाळे, कामगार अधिकारी स्मिता साबळे, औषध निरिक्षक राहूल करंडे, दहशतवाद विरोधी विभागाचे पोलीस निरिक्षक गरड, महावितरणचे बोरकर, नायब तहसिलदार सी.आर. पाटील, बिरवाडीचे तलाठी अनंता साबळे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे स.पोलीस निरिक्षक जीवन माने सहभागी झाले होते. मागच्याच महिन्यात अशाच तपासणी मोहिमेत एका कारखान्याच्या मालकाविरुद्ध सुरक्षेच्या उपाययोजना न राबविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता.