अलिबाग-वडखळ महामार्ग दुरुस्तीला सुरुवात ; निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप, अलिबागकर संतप्त

By Raigad Times    12-Sep-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | रायगड जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अलिबाग-वडखळ महामार्ग सध्या खड्ड्यात गेल्याने नागरिक संतप्त झाले होते. नुकतेच अलिबागकर रस्त्यावर उतरून संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली. मात्र, दुरुस्तीच्या कामात निकृष्ट दर्जाचा आरोप पुढे आला आहे.
 
पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अलिबाग वडखळ महामार्ग सध्या खड्ड्यात गेल्याने नागरिक संतप्त झाले होते. नुकतेच अलिबागकर रस्त्यावर उतरून संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली. गुरुवारी (११ सप्टेंबर) दुरुस्ती कामाला सुरुवात झाली आहे.
 
मात्र नागरिकांनी कामाची गुणवत्ता समाधानकारक नसल्याने पुन्हा रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला. दरवर्षी लाखो रुपये खर्च करून दुरुस्तीचे काम केले जाते, पण काही महिन्यांतच रस्ता पुन्हा खड्ड्यांनी भरतो. यामुळे केवळ वाहतूक कोंडीच नव्हे, तर अपघातांचा धोकाही वाढतो.
 
अलिबाग-वडखळ हा रस्ता पर्यटन, व्यापार आणि स्थानिक वाहतूक या सर्वांसाठी महत्त्वाचा असला, तरी प्रशासन आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. कामात दोषी आढळल्यास कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत असून, दर्जेदार रस्ता देण्याची हमी मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही दिला आहे.