अघोरी कृत्याला विरोध करणार्‍या आदिवासी युवकाला मारहाण

By Raigad Times    11-Sep-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत । कर्जत तालुक्यातील हालीवली आदिवासी वाडीतील स्मशानभूमीत दोन महिन्यांपूर्वी जादूटोणा व अघोरी कृत्याला विरोध करणार्‍या एका आदिवासी युवकाला मारहाण करण्यात आली. त्यामुळे आदिवासी बांधवांनी संताप व्यक्त करीत पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर मारहाण करणार्‍या व्यक्तीवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट, अंधश्रद्धा जादूटोणा, अघोरी कृती संदर्भात गुन्हा दाखल केला.
 
11 जुलै 2025 रोजी हालिवली गावातील ग्रामस्थ राजेश गोपाळ शिंदे व त्याचे सहकार्‍यांना कातकरवाडी येथील स्मशानभूमीमध्ये जादूटोणा व अघोरी कृत्य करताना आदिवासीबांधवांनी विरोध दर्शविला होता. ही तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात दाखल झाली असताना त्याचा डाव फसल्याने शिंदे यानी मनात राग धरून जादूटोणा अघोरी कृत्याला विरोध करणार्‍या समाजाच्या विष्णू गणपत वाघमारे या युवकाला रस्त्यात गाठून जबर मारहाण केली.
 
या घटनेची माहिती मिळताच आदिवासी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कोकणप्र देशाध्यक्ष मालू निरगुडे, बिरसा ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष अनंता वाघमारे, जिल्हा सचिव सचिन वाघमारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप डाके, खालापूर तालुका कमिटीचे अध्यक्ष नारायण निरगुडे, सचिव रवी बांगारे, सहसचिव राजू सुतक, देहू दरवडा, तुळशीराम कवठे, अनिल पारधी, संजय पवार, रवी पवार, अविनाश वाघमारे, शंकर वाघमारे, नितीन पवार, इत्यादी समाज संघटनेचे पदाधिकारी व आदिवासी समाज मोठ्या संख्येने कर्जत पोलीस ठाण्यात गेले. तेथे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर कर्जत पोलीस ठाण्यात राजेश गोपाळ शिंदे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट, अंधश्रद्धा जादूटोणा, अघोरी कृतीसंदर्भात गुन्हा दाखल केला.