मुरुड-जंजिरा । मुरुड तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी येत्या 2 ऑक्टोबरपासून खुला होणार असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाचे अधिकारी बंजरंग येळीकर यांनी दिली. सध्या किल्ल्याची सफाई व इतर आवश्यक कामांना गती देण्यात येत आहे.
मुरुड, काशीद, नांदगाव, श्रीवर्धन, अलिबाग, नागाव, रेवदंडा, आक्षी, किहीम आदी परिसरातील प्रमुख आकर्षण असलेला जंजिरा किल्ला दरवर्षी हजारो पर्यटकांना भुरळ घालतो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून किल्ला बंद असल्याने स्थानिक पर्यटन व आर्थिक घडामोडींवर मोठा परिणाम झाला होता. राजपुरी जेटीवर भरतीमुळे पर्यटकांना मोठा त्रास होत असल्याने बोटीधारकांनी स्वखर्चाने तिकीट घरासमोरच तात्पुरती जेटी बांधली आहे.
दरम्यान, 93 कोटी खर्चून बांधलेली नवीन जेटी लवकरच सुरु होणार असून पर्यटकांना मोठी सोय होणार आहे. मात्र जेट्टीवर सावलीसाठी शेड, तसेच तिकीट खिडकी सकाळी 8 वाजता सुरु करण्याची मागणी पर्यटकांनी केली आहे, कारण पर्यटक पहाटेपासूनच मोठ्या संख्येने येथे पोहोचतात. किल्ल्यातील अनेक बुरुजांना समुद्राच्या लाटांमुळे भगदाडे पडली असून, गेल्या 15 वर्षांत एकदाही दुरुस्तीसाठी निधी न आल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली.
किल्ल्यातील प्रवेश तिकीटातून मिळणारा महसूल किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी वापरण्याची मागणीही होत आहे. पर्यटनावर अवलंबून असलेल्या मुरुड परिसरातील अर्थकारणाला चालना मिळवण्यासाठी जंजिरा किल्ल्याची तातडीने दुरुस्ती, नवीन जेटी आणि आवश्यक सुविधा उभारण्याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे.