खोपोली | अडिच टन वजनाची लोखंडी प्लेट अंगावर पडून महिंद्रा सॅनियो कारखान्यात एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. कंपनी सुरक्षा विभागाच्या दुर्लक्षामुळे एक जीव गेला असून कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
कंपनी व्यवस्थापनाने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केल्यावर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. बुधवारी (६ ऑगस्ट) दुपारी खोपोली शहरातील पोलाद उत्पादन करणार्या महिंद्रा सॅनियो कंपनीतील एचटीएमएफसी प्लांटमधील मशिनचे देखभाल दुरुस्तीचे काम सुरु होते. नरेंद्र पांडुरंग देशमुख हे मशिनखाली साफसफाई करत असताना मशिनवरील अडिच टनाची लोखंडी प्लेट छातीवर पडली.
यादरम्यान प्लेट क्रेनच्या सह्याने उचलून कामगाराला बाहेर काढून खोपोलीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर बसल्याने त्यांना एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर नरेंद्र यांचे नातेवाईक आणि संजय देशमुख, मिलिंद देशमुख, रविंद्र खंडागळे, दिलीप देशमुख, सुरेश देशमुख यांनी कंपनी व्यवस्थापक तानाजी पाठारे, बाणे यांच्याकडे मृत कामगार नरेंद्र यांची पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांना नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव ठेवला; परंतु कंपनी व्यवस्थापनाच्या नकारात्मक भूमिकेमुळे नातेवाईक आक्रमक झाले. अखेर रात्री उशिरा खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी मध्यस्थी केल्यावर कंपनी व्यवस्थापनाने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले.