अलिबाग | पोलाद उद्योगात अग्रगण्य असलेल्या जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या पेण-वडखळ परिसरातील विस्तारित प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला शिवसेनेने (शिंदे गट) जाहीर पाठींबा दिला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी याबाबतची भूमिका मांडली. मात्र पाठींबा देतानाच त्यांनी काही अटी-शर्ती घातल्या आहेत.
यामध्ये प्रकल्पात स्थानिकांना तरुणांना रोजगार देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.शुक्रवारी (८ जुलै) कुसुंबळे येथे पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजा केणी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारीत प्रकल्पाबाबतची जनसुनावणी २२ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने प्रकल्पाबाबतचा अहवाल आसपासच्या ग्रामपंचायतीमध्ये ठेवलेला आहे.
जेएसडब्ल्यू विस्तारीत प्रकल्प कोल बेस असल्याची अफवा पसरवली जात आहे, प्रत्यक्षात हा प्रकल्प गॅसबेस असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. तसेच या प्रकल्पामध्ये ८० टक्के स्थानिक तरुणांना प्राधान्य दिले जाईल, असा शब्ददेखील कंपनी व्यवस्थापनाने दिल्याचे राजा केणी यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे प्रदूषण होणार नसल्याची ग्वाही कंपनीने दिली असली तरी भविष्यात पर्यावरणाची समस्या निर्माण झाली तर आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशाराही केणी यांनी दिला आहे.
जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारीत प्रकल्पाबाबत वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत. या प्रकल्पाला काहींनी समर्थन दर्शवले आहे. शिवसेनेने घेतलेली भूमिका कंपनीसाठी ही सकारात्मक बाजू ठरली आहे. बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा, स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य मिळावे ही भूमिका शिवसेनेची आहे. विरोधाला विरोध करण्यापेक्षा स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेने जेएसडब्ल्यूच्या नवीन प्रकल्पाला समर्थन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे राजा केणी म्हणाले.
नोकरीत सामावून घेताना प्रथम कंपनीच्या १५ किलोमीटर परीसरात राहणार्या बेरोजगार तरुणांचा विचार व्हावा, त्यानंतर जिह्यातील इतर तरुणांना प्राधान्य द्यावे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. शिवसनेच्या वरिष्ठ नेतेमंडळींची कंपनी प्रशासनाशी चर्चा झाली असून त्यांनी देखील शिवसेनेची भूमिका मान्य केल्याचे राजा केणी यांनी सांगितले.
जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात तरुण रोजगाराच्या शोधात आहेत. त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे येणार्या जिल्ह्यात येणार्या नवीन प्रकल्पांना कोणीही विरोध करु नये, असे आवहन त्यांनी केले आहे. यावेळी शिवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे, पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे, उत्तम पाटील, जीवन पाटील, संकेत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.