नवी दिल्ली | रायगडच्या पालकमंत्रीपदाचा पेच दिल्ली दरबारी पोहचला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि भाजप नेते अमित शहा यांच्यातील चर्चेनंतर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यामुळे या स्वातंत्र्य दिनी तरी रायगडला पालकमंत्री ध्वजारोहण करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या अदिती तटकरे आणि भरत गोगावले या महायुतीतील दोन मंत्र्यांमध्ये जोरदार शीतयुद्ध सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी महायुतीमधील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
तसेच एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या भेटीत रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन चर्चा झाल्याचे समजते आहे. यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी बसून प्रश्न सोडवण्याच्या सूचना अमित शाह यांनी दिल्या. शाह यांच्या सूचनेनंतर सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात दिल्लीत बैठक झाली. या भेटीनंतर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याची चर्चा आहे. मात्र तटकरे यांनी मतदारसंघातील विकासकाकामांबबात चर्चा झाली असे सांगत, पालकमंत्रीपदावर बोलण्याचे टाळले.
त्यामुळे या तरी १५ ऑगस्टला नवीन पालकमंत्र्यांच्या हस्ते रायगडमध्ये झेंडावंदन होणार की नाही? असा प्रश्न कायम आहे. राज्य सरकारकडून १८ जानेवारी २०२५ रोजी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. यात रायगडमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे आणि नाशिकमधून भाजपचे गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रायगडमधून शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले इच्छुक होते. त्यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर अवघ्या एक दिवसात रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला. यानंतर आजपर्यंत हे पालकमंत्रिपद रखडले आहे.