मुंबई-गोवा महामार्गाची रखडपट्टीच! मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा पुन्हा पाहणी दौरा!

By Raigad Times    07-Aug-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | किती आले आणि किती गेले...मुंबई गोवा महामार्गाचे काम काय कोणाला पूर्ण करता आले नाही. मंत्री, मुख्यमंत्री इतकेच कशाला केंद्रीय मंत्री गडकरीदेखील थकले. आता गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांना खड्ड्यांमुळे आणि रस्त्यांच्या कामांमुळे त्रास सहन करावा लागणार, हे पक्के आहे. तत्पूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज (७ जुलै) पुन्हा एकदा या महामार्गाची पाहणी करणार आहेत.
 
सात महिन्यांपूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला होता. सरकारी प्रशासनाकडून रस्त्याच्या कामाची प्रगती जाणून घेण्यासाठी पुन्हा मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे आज सकाळी साडेदहा वाजल्यापासून पनवेलमधील पळस्पे ते रत्नागिरी (हातखंबा) या पल्यावरील महामार्गाची पाहणी करणार आहेत. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात हेच मंत्री याच महामार्गाची पाहणी दौरा करून त्यांनी जानेवारी २०२६ पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे जाहीर केले.
 
alibag
 
मात्र गेल्या सात महिन्यांत कामात फारशी प्रगती झाली नाही. त्यामुळे अजून किती मुहूर्त मंत्र्यांकडून या महामार्गाच्या पूर्णत्वासाठी सांगितले जातील? असा सवाल कोकणवासियांकडून विचारला जात आहे. गेल्या १२ वर्षांत मुंबई गोवा महामार्गाचे काम केंद्र व राज्य सरकार पूर्ण करु शकले नाही. कोकणवासियांनी याविषयी अनेक आंदोलने केली. कोकणाचे प्रवेशव्दार असणार्‍या पनवेलमधील जेएनपीटी महामार्गावरील पळस्पे उड्डाणपुलावरील खड्डे तसेच पळस्पे येथील पुलाखालील खड्ड्यांची जाणीव मंत्र्यांना होऊ नये, अशा पद्धतीने मंत्र्यांच्या दौर्‍याची आखणी केली जाते.
 
रायगड जिल्ह्यातील माणगाव, कोलाड, रोहा या तालुक्यांसह रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर ते लांजा या पल्यावर अक्षरशः रस्त्यामुळे वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे प्रवाशांचे कंबरडे मोडत आहेत. पाहणी करण्यासाठी मंत्री येणार असे समजल्यास महामार्गावरील खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी करून त्यावर मुलामा दिला जातो. मात्र शेकडोंचे अपघाती जीव घेणारा हा महामार्ग कधी तयार होणार? याविषयी राज्य व केंद्रातील मंत्री मूग गिळून गप्प आहेत.
 
आजपर्यंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे तत्कालीन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी अनेक व्यासपीठावरून या महामार्गाचे काम पुर्ण करण्याचे नवीन मुहूर्त जाहीर केले आहेत. या मुहूर्ताच्या तारखांमुळे मंत्री खोटारडे ठरत आहेत. विद्यमान मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी फेब्रुवारी महिन्यात दौरा केला होता. नवा मुहूर्त जाहीर करून ११ महिन्यांची मुदतवाढ कंत्राटदारांना दिली. मात्र सात महिने उलटले असून कामाच्या प्रगतीची पाहणी मंत्री भोसले करणार आहे. दरम्यान, २१ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी गणेशभक्ताला सुखरूप आणि विना वाहनकोंडीचे गावी पोहचण्यासाठी मंत्री काय सूचना देतात? याकडे कोकणवासियांचे लक्ष्य लागले आहे.