कर्जत | कर्जत येथील पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अज्ञात आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी कर्जत प्रेस असोसिएशनकडून कर्जत पोलिसांना निवेदन देण्यात आले. कर्जत पोलीस तसेच कर्जत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून पाच दिवसात आरोपी अटकेत झाले नाहीत तर पत्रकार आंदोलन करणार आहेत.
कर्जत शहरात राहणारे प्रथमेश कुडेकर हे एक ऑगस्ट रोजी आपल्या नेहमीच्या ठिकाणी चहा प्यायला गेले आणि तेथून परतत असतांना चौक कर्जत रस्त्यावर चार फाटा येथील कृषी संशोधन केंद्राच्या समोर असलेल्या रस्त्यावर गाडी थांबवून मारहाण करण्यात आली होती.
रॉड तसेच फायटर साहित्य हातात असलेल्या चार जणांनी ही मारहाण केली. तर कुडेकर यांच्यासोबत असलेला त्यांच्या मित्राला तोंडावर मास्क आलेल्या त्या अज्ञात लोकांनी तुझ्या मित्राला सांग असे काही पुटपुटत सिल्वर रंगाच्या वेगनर गाडी पळून गेले. निर्भीड पत्रकार म्हणून समाजात ओळख निर्माण करणारे प्रथमेश कुडेकर यांना बातमी दिल्याच्या वैमनस्यातून हल्ला केला असावा असा अंदाज बांधला जात आहे.
संबंधित प्रकरणी एक ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून घटनेच्या तिसर्या दिवसापर्यंत पोलिसांनी कोणाही संशयित व्यक्तीला चौकशीसाठी अद्याप ताब्यात घेतले नाही. त्यामुळे पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने चालला आहे, तपासाला गती मिळाली आहे किंवा नाही याबाबत माहिती घेण्यासाठी कर्जत प्रेस असोसिएशनचे पत्रकार कर्जत पोलीस ठाणे येथे पोहचले होते.
प्रेस असोसिएशनकडून कर्जत पोलीस यांना निवेदन देण्यात आले असून पाच दिवसात या प्रकरणी कर्जत पोलीस यांनी छडा लावून आरोपींना अटक केली नाहीतर मात्र पत्रकार आंदोलन करणार असल्याचे लेखी निवेदन देण्यात आले आहे. त्यानंतर पत्रकारांनी ही निवेदन कर्जत तहसीलदार डॉ. धनजंय जाधव यांना प्रशासकीय भवन येथे भेटून निवेदन दिले. यावेळी कर्जत प्रेस असोसिएशनचे पदाधिकारी तसेच अनेक पत्रकार उपस्थित होते.