नवी मुंबई | हार्बर रेल्वे मार्गावरुन प्रवास करणार्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. हार्बर रेल्वे मार्गावर आजपासून रात्रकालीन ब्लॉक वाशी स्थानकात घेण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे कामामुळे मेगाब्लॉक आयोजित करण्यात येणार आहे.
हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवार (ता. ८) दरम्यान दररोज रात्री १०.४५ ते पहाटे ३.४५ या वेळेत अप व डाऊन मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत वाशी ते पनवेलदरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.
ब्लॉकदरम्यान काही लोकल सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. काही गाड्या ठरावीक स्थानकांपर्यंतच धावणार आहेत. बेलापूरहून रात्री ८.५४ वाजता सुटणारी बेलापूर-सीएसएमटी लोकल वाशीपर्यंतच धावेल, तर रात्री ९.१६ची बेलापूर-सीएसएमटी लोकल वडाळा रोडपर्यंतच धावणार आहे. वांद्रे-सीएसएमटी लोकल रात्री १० वाजता सुरू होऊन वडाळा रोडवरच थांबवण्यात येणार आहे. पनवेलहून रात्री १०.५५ आणि ११.३२ वाजता सुटणार्या पनवेल-वाशी लोकल सेवा नेरूळपर्यंतच चालविण्यात येणार आहेत. दरम्यान, गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे.