जेएसडब्ल्यू कंपनीच्या कारनाम्याची गंभीर दखल , कंपनी व्यवस्थापनसोबत बैठक घेण्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

By Raigad Times    06-Aug-2025
Total Views |
 mumbai
 
मुंबई | राज्यातील प्रदूषणासंदर्भात ठोस आणि कठोर उपाययोजना करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीने कांदळवन नष्ट करुन केलेली पर्यावरणाची हानी तसेच सरकारी जमिनीवर अनधिकृत बांधकाम यांची गंभीर दखल विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी घेतली.
 
त्यांनी तातडीने जेएसडब्ल्यू कंपनीच्या व्यवस्थापनसोबत बैठक घेण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. मंगळवारी (५ ऑगस्ट) विधानभवन, मुंबई येथे महाराष्ट्रातील प्रदूषणासंदर्भात विद्यमान आमदार सना मलिक आणि आमदार सुनिल प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. महाराष्ट्रातील प्रदूषणाची दाहकता लक्षात घेऊन उपाययोजना करण्यासंदर्भात विचारमंथन झाले. यावेळी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
 
अलिबाग तालुक्यामधील मौजे जुई बापूजी येथील सर्वे नंबर ५०-‘ड’, क्षेत्र १.८४ हे.आर. या जमिनीवर जेएसडब्ल्यू कंपनीने अतिक्रमण केले होते. या ठिकाणी कंपनीने कांदळवनांचे क्षेत्र नष्ट करून मातीचा भराव, संरक्षक भिंत, कनव्हेअर बेल्टसाठी सिमेंट काँक्रिटचे फाऊंडेशन अशी कामे केल्याचे वन विभागाच्या अहवालात म्हटले आहे.
 
उप वनसंरक्षक अलिबाग आणि उपअधिक्षक भूमि अभिलेख, अलिबाग यांनी जिल्हाधिकारी रायगड यांना सादर केलेल्या अहवालात, राखीव वन जमिनीवर जेएसडब्ल्यू कंपनीने भराव, बेकायदा बांधकाम तसेच प्रकल्प विस्ताराचे काम केल्याचे दिसून आले, असे म्हटले आहे. डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीने पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले कांदळवन नष्ट केल्याच्या तक्रारी आहेत. या संदर्भात जेएसडब्ल्यू कंपनी व्यवस्थापनाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी एक बैठक घेण्यात यावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.