अलिबाग | अलिबाग तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या युरिया खताची तीव्र टंचाई निर्माण झाली असून खताच्या तुटवड्यामुळे शेतकर्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे युरिया खत तातडीने उपलब्ध करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी केली आहे.
अलिबाग तालुक्यातील सर्व शेतकरी या समस्येने त्रस्त झाले आहेत. वेळोवेळी खत दुकानांत फ ेर्या मारूनही युरिया खत उपलब्ध न झाल्याने शेतकर्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही आठवड्यांपासून युरिया खत मिळत नसल्यामुळे बियाणे टाकूनदेखील पुढील प्रक्रिया थांबली आहे. यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन कर्जबाजारीपणाचा धोका वाढण्याची शक्यता आहे, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकर्यांनी प्रशासनाकडे तातडीने युरिया खत उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने त्वरीत पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी होत आहे. गेल्या महिनाभरापासून खत उपलब्ध न झाल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे. याचा परिणाम तालुक्यातील ताडवागळे, श्रीगाव, कुसुंबळे, पिटकीरी, रावेत, कुर्डूस, आंबेगाव, पेझारी, चरी, कोपर, शहापूर, शहाबाज या परिसरातील शेतकर्यांवर होत आहे, याकडेही राजा केणी यांनी लक्ष वेधले आहे.
मनसेकडून मागणी
युरिया खताची टंचाई भासत असल्यामुळे मनसेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकर्यांना तत्काळ खत मिळावे, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात देवव्रत विष्णू पाटील, सिद्धू म्हात्रे (तालुका अध्यक्ष), गोरखनाथ पाटील (ग्राहक परिषद सदस्य) आणि रामकृष्ण पाटील (शेतकरी, मानकूळे) सहभागी होते.