अलिबाग | रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा स्वातंत्र्य दिनापूर्वी सोडवला जाईल, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. तसेच, १५ ऑगस्टला भरत गोगावले यांनाच ध्वजारोहण करायला मिळावे, असेही सामंत यांनी म्हटले आहे. सामंत यांच्या या वक्तव्याला मंत्री भरत गोगावले यांनी पाठिंबा दिला आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे रायगडसोबतच नाशिकचा तिढादेखील सोडवतील, असेही सांगण्यात आले आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांच्यात वाद आहे. रायगडात शिवसेनेचे तीन आमदार असल्यामुळे हे पद शिवसेनेला मिळावे, यासाठी मंत्री भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी, आ. महेंद्र थोरवे आग्रही आहेत.
तर महायुतीत रायगडचे पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीला मिळाले असल्याने तटकरेदेखील ती दावेदारी सोडायला तयार नाहीत. शेवटी मुख्यमंत्र्यांनी अदिती तटकरे यांना दिलेले पद स्थगित केले होते. असे असले तरी यानंतर झालेल्या प्रजासत्ताक आणि महाराष्ट्र दिनी रायगडात मंत्री अदिती तटकरे यांनी ध्वजारोहण केले होते. आता स्वातंत्र्य दिनापूर्वी पालकमंत्रीपदाबाबत तोडगा निघेल, अशी अपेक्षा उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. तसेच यावेळी स्वातंत्र्य दिनी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते जिल्हा मुख्यालयातील ध्वजारोहण करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.