वडशेत पूल मोजतोय अखेरची घटका , पूल पडल्यास ९ गावांचा संपर्क तुटणार; वीस किमीचा वळसा

By Raigad Times    05-Aug-2025
Total Views |
 shreewardhan
 
दिघी | श्रीवर्धन तालुयातील वडशेत गावाजवळ असलेला पूल सध्या शेवटची घटका मोजत आहे; मात्र याकडे शासकीय अधिकार्‍यांचे पत्रव्यवहार करण्यापलीकडे काहीच हालचाल नसल्याचे समोर आले आहे, त्यामुळे या पावसाळी दुर्घटना घडल्यास तब्बल नऊ गावांचा संपर्क तुटण्याची शयता आहे.
 
रायगड जिल्हा परिषदच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत्या हा पन्नास वर्षे पूर्वी बांधलेला आहे. वडशेत व साखरी गावाला जोडण्यासाठी पूल बांधण्यात आलेला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांच्या काळात हा पूल बांधण्यात आला होता. पुलानंतर ग्रामस्थांनी बैलगाडीने मिरवणूक काढत त्यांचा सन्मान केलं होता असे येथील माजी उपसरपंच रमेश गुजर सांगितले. पूल अरुंद असल्याने एका वेळी एकच चारचाकी गाडी जात आहे त्यामुळे इतर मोठ्या वाहनांना थांबावे लागत आहे असे वावे ग्राम अध्यक्ष श्रीधर सावंत यांनी सांगितले.
 
त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पुलाच्या खाली बाजूस असणार्‍या लोखंडी सळ्या दिसू लागल्याने पुलावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. खालील बाजूचे सिमेंटचे प्लास्टर देखील गळू लागले आहे. त्यामुळे या पुलाची डागडुजीकरण करण्याची आवश्यकता आहे. वाढत्या रहदारीच्या व वाहतुकीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मजबूत पूल बांधण्याची गरज आहे. पुलाखालील बांधकामाचे लोखंड गंजू लागल्याने तो खचण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. पुलाच्या खांबांचा पाया अक्षरशः खचत चालला आहे तर पुलावर झुडुपे उगवली आहेत.
तर २० किलोमीटरचा वळसा
येत्या पावसाळी पूल खचला तर वावे, वडशेत, धारिवली, साखरी, आडी, कारिवणे, कोलमंडले, कोळे व कोंड या गावातील ग्रामस्थांना वीस कीलोमीटर चा वळसा घेत बागमांडले मार्गे जावे लागेल.
वडशेत पुलाबाबत माहिती घेऊन दुरुस्ती व नव्याने पुल बांधणी असे दोन प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. - संजय सूर्यवंशी, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग माणगाव
वडशेत वावे पुलासाठी आम्ही ग्रामपंचातकडून आमदार, खासदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद सर्वांना पत्रव्यवहार केला आहे. पूल लवकरच होणे आवश्यक आहे अन्यथा पूल पडल्यास या भागातील विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, गरोदर माता यांचे प्रचंड हाल होतील. पूल नवीन करावा अशी आमची मागणी आहे. - मनोहर सावंत, सरपंच, वडशेत वावे.