उरण | १ ऑगस्टपासून मासेमारीचा नवा हंगाम सुरू झाला आहे. मात्र मासेमारी करण्यासाठी लागणारे डिझेल तेल अनुदान मिळण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून परवानगी मिळण्याची प्रतीक्षा आहे. जोपर्यंत मत्स्य विभागाच्या आयुक्तांकडून परवानगी मिळत नाही, तोपर्यंत मासेमारी बोटी घेऊन समुद्रात उतरता येणार नाही.
त्यामुळे मच्छिमारांची आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. मासेमारी करणार्यांना शासनाकडून मासेमारीसाठी वापरण्यात येणार्या बोटींना वर्षाकाठी ३५ हजार लिटर डिझेल दिले जाते. या डिझेलवर शासनाकडून डिझेलवरील वॅट किंवा लिटर मागे १८ रुपयांची सूट दिली जात आहे. यालाच मच्छिमार डिझेल परतावा, असे म्हणतात. हे तेलावरील अनुदान शासनाच्या मत्स्य विभागाने त्याचा कोटा मंजूर केल्याशिवाय मिळत नाही.
तर मागील दोन ते तीन महिन्यांचे डिझेलवरील परतावे थकले आहेत. याचा परिणाम मासेमारीच्या नव्या हंगामावर होण्याची शक्यता आहे. शासनाने पावसाळ्यात घातलेली खोल समुद्रातील मासेमारी बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून मासेमारी सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांतील डिझेल कोटा सरकारकडून मिळालेला नाही. त्यामुळे हजारो मच्छिमारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा कोटा सरकारने लवकरात लवकर मंजूर करावा, अशी मागणी मच्छिमारांनी शासनाकडे केली आहे. फेरीसाठी चार लाख रुपये खर्च.
एका फेरीसाठी चार लाख रुपये खच
मासेमारी करण्यासाठी जाणार्या एका बोटीसाठी किमान चार लाख रुपये खर्च येतो. यात सर्वात अधिक खर्च डिझेलचा असतो, अशी माहिती करंजा करंजा येथील मच्छीमार नेते रमेश नाखवा यांनी दिली आहे. बोट मालक आणि बोटीवर काम करणारे खलाशी व चालक तांडेल यांच्यात खर्च जाऊन मिळणार्या नफ्याचा निम्मा निम्मा वाटा हा समान वाटण्यात येतो.
एका फेरीसाठी किमान चार ते पाच दिवस लागतात. गतवर्षी सुरू झालेल्या करंजा येथील बाजारात दररोज दोन कोटीचा व्यवहार होत होत आहे. त्यामुळे दहा महिन्यांत ५०० कोटींच्या मासोळीची निर्यात झाली असल्याची माहिती करंजा मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी दिली.
करंजा द्रोणागिरी बंदरात खवय्यांची गर्दी
गेल्या वर्षापासून उरणच्या करंजा बंदरात मासळी बाजार सुरू झाला आहे. त्यामुळे बंदी उठताच खरेदीसाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे. स्वस्त दरात मासळी खरेदी करण्यासाठी खवय्ये करंजा मच्छी बंदरात गर्दी करत आहेत. करंजा, मोरा, दिघोडे, आवरे परिसरात मोठ्या प्रमाणात खोल समुद्रातील मासेमारी करण्यात येत आहे.
यामध्ये सुमारे ७०० पेक्षा अधिक मासेमारी बोटी असून, मासळीची खरेदी विक्री करण्यासाठी त्यांना मुंबईतील ससून डॉक आणि भाऊचा धक्का येथे जावे लागत होते. दरम्यान, फिशिंग डॉक करंजा येथे उभारण्यात आले आहे. येथील खरेदी विक्रीमुळे द्रोणागिरी मत्स्य व्यवसाय बंदर मासळी खरेदीसाठी महत्त्वाचे ठरत आहे.