सुधागड-पाली | पालीतील सरसगड किल्ल्यावरून पडून एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (२ ऑगस्ट) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. निखिल कदम असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा सातारा येथील आहे व पुणे येथे नोकरी करतो. एका कंपनीचा ग्रुप पुण्यातून पालीतील सरसगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आला होता.
यावेळी सरसगडावरून उतरतांना तिसर्या पायरीवरून पाय घसरून निखिल कदम पायर्यांच्या बाजूला असलेल्या दरीत कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तसेच खांदा फ्रॅक्चर झाला असून, मानेलाही दुखापत झाली आहे. रात्री पावणेदहा वाजता किल्ल्यावरुन निखिल कदम याला खाली आणण्यात आले व पालीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून, पुढील उपचारांसाठी कामोठे पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि तेथून रविवारी (३ ऑगस्ट) सकाळी पुढील उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाली पोलीस, स्थानिक आपदामित्र, सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्य आणि पालीतील स्वयंसेवक त्या ठिकाणी पोहोचले व रेस्क्यु केले.