अंत्ययात्रेची वाट बिकट, अ‍ॅफकॉनवर गावकरी संतापले

By Raigad Times    04-Aug-2025
Total Views |
 uran
 
उरण | चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अफकॉन कंपनीने उखडून टाकल्याने अंत्यविधीसाठी जाणार्‍या गावकर्‍यांना उखडलेल्या चिखलमय रस्त्यातून वाट काढत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ भरपावसात आली आहे. अ‍ॅफकॉन कंपनीच्या माध्यमातून रेवस करंजा या सागरी उड्डाण पुलाचे काम सुरू आहे.
 
सदर कंपनीने समुद्र किनार्‍यावरील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता हा गावकर्‍यांना विश्वासात न घेता उकडून टाकल्याने त्याचा नाहक त्रास करंजापाडा, नागपाडा, बोबडीपाडा येथील शेतकरी, कोळीबांधवांना सहन करावा लागत आहे. जगदीश लक्ष्मण म्हात्रे या स्थानिक रहिवाशाचा मृत्यू रविवारी (३ ऑगस्ट) झाला.
 
म्हात्रे यांचे प्रेत अंत्यविधीसाठी घेऊन जाताना त्याच्या नातेवाईक, गावकरी मंडळींना संघर्ष करावा लागला. उखडलेल्या रस्त्यातून, चिखलातून त्यांना मार्ग काढावा लागला. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.