पोलादपूर | खरीप पीक रोगाबाबत दक्ष रहावे , कृषी अधिकारी वैशाली फडतरे यांचे प्रतिपादन

By Raigad Times    04-Aug-2025
Total Views |
poladpur
 
पोलादपूर | तालुयातील खरीप हंगामातील सर्व पिकांची पेरणी लावणी पूर्ण झालेली आहे. भात खाचरे हिरवीगार दिसत आहेत. पीक वाढीसाठी सर्वदूर हवामान अत्यंत पोषक असून समाधानकारक पाऊस पडत आहे. मात्र, उन्ह पावसाच्या श्रावण महिन्यांपासून भात, नाचणी आदी खरीप पिके तसेच भाजीपाल्यावर येणार्‍या किडी व रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकर्‍यांनी दक्ष राहण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे यांनी केले आहे.
 
खरीप हंगामामध्ये वातावरणातील बदलांमुळे पिकांवर विविध कीड व रोग यांचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्यामध्ये प्रामुख्याने पोलादपूर तालुयातील कापडे परिसरामध्ये खरीप हंगाम सन २०२३ मध्ये भात पिकावर निळे भुंगेरे या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला होता. वेळेवर शेतकरी तसेच कृषि विभागाचे क्षेत्रिय अधिकारी यांनी कीड नियंत्रण उपाय करुन किड नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले होते.
 
सद्यस्थितीमध्ये पाऊसमान चांगले असून भात पीक वाढीच्या कालावधीत भात शेतात पाण्याचे नियोजन करणे पीक वाढीच्या व कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी अत्यावश्यक बाब आहे. भात लावणीनंतर सुरुवातीच्या १ महिना कालावधीमध्ये २ ते ३ से. मी. उंची इतके पाणी शेतामध्ये बांधून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. १ महिन्यानंतर म्हणजे आताच्या परिस्थितीमध्ये भात पिकाचे दाणे तयार होईपर्यंत ५ से.मी. उंची इतके पाणी बांधून ठेवणे गरजेचे आहे.जमीन पाणथळ होते तसेच पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. यामुळे भात पिकावर निळे भुंगेरे, तपकिरी तुडतुडे या किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो आणि पिकाचे नुकसान होते.
 
निळे भुंगेरे भात पिकावर पडणारी एक घातक कीड आहे. या किडीची अळी आणि प्रौढ भुंगे या दोन्हीही अवस्था भात पिकासाठी नुकसानकारक आहेत. किडीचे भुंगेरे गर्द निळ्या रंगाचे असतात तर अळी भुरकट पांढर्‍या रंगाची असते. कीड पानाचा हिरवा भाग खरडवून खाते. त्यामुळे पानांवर पांढरे पट्टे दिसून येतात रासायनिक पद्धतीने कीड नियंत्रणासाठी प्रती हेटरी ५०० लिटर पाण्यातून क्विनॉलफॉस २५ टक्के २ लिटर किंवा लॅमडासायहॅलोथ्रिन ५ टक्के २५० मि.ली. या पैकी एका किटकनाशकाची फवारणी घ्यावी. सुरळीतील अळी या किडीचे फुलपाखरु लहान, नाजूक दुधाळ पांढर्‍या रंगाचे असते.
 
पंखावर फिकट काळे लहान लहान ठिपके असतात. अळी पारदर्शक फिकट हिरवट पांढरट असते. त्यामुळे भाताच्या पानांवर पांढरे पट्टे दिसून येतात, शेत निस्तेज दिसते, पिकाची वाढ खुंटते. आवश्यकता वाटल्यास फेनथोएट ५० टक्के प्रवाही किटकनाशक १ ली. ५०० लिटर पाण्यातून प्रति हेटरी फवारणी करावी. खेकडा खरीप हंगामामध्ये खेकड्यांमुळे भात शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. भाताची रोपे कापून बिळामध्ये खाण्यासाठी नेणार्‍या खेकड्यांमुळे शेतामध्ये बेडकांचे संवर्धन करणे हा महत्त्वाचा उपाय ठरतो कारण खेकड्यांची पिले बेडूक खातो.
 
याखेरीज आठवड्यातून २-३ दिवसांनी बांधावरची खेकडी पकडून नियंत्रण ठेवावे अथवा मिथील पॅरॉथिऑन वापरूनही खेकड्यांवर नियंत्रण ठेवता येते. कोकण परिसरात भात पिकावर करपा, कडाकरपा, शेंडे करपा, पर्णकोष करपा, आभासमय काजळी, उदबत्ता सारखे रोग प्रामुख्याने आढळतात. त्याचेही नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी भात शेतीची स्वच्छता खुप महत्वाची आहे. पीक कापणीनंतर शेतातील धस्कटे काढून नष्ट करावे. बांधावरील तणांचा नाश करावा. बांध बंदिस्ती करावी.
 
जमिनीची खोल नांगरणी करावी. रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी. पेरणीपूर्व भात बियाण्यास बिज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. पिकास संतुलित खतांचा वापर करावा. करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास कार्बेन्डॅझिम ०.१, मॅन्कोझेब ०.२५ टक्के किंवा कॉपर ऑसीलोराईड ०.२५टक्के २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन पोलादपूर तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे यांनी केले आहे. कीडरोग नियंत्रणाबाबत अधिक मदतीकरीता क्षेत्रीय मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि गावपातळीवर कृषी सहायक यांची मदत घ्यावी, असेही फडतरे म्हणाल्या.